पंचायत राज’कडून कोल्हापूर अधिकाऱ्यांची झाडाझडती वडणगे पाणी योजनेवरून फैरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 12:57 AM2018-09-06T00:57:34+5:302018-09-06T01:02:39+5:30
जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या पंचायत राज समितीने पहिल्याच दिवशी अधिकाºयांची झाडाझडती घेतली. ग्रामविकास आणि शिक्षण विभागाच्या सचिवांना साक्षीसाठीही बोलावण्याचे आदेश समितीने दिले असून वडणगे पाणी योजनेवरून जोरदार फैरी
कोल्हापूर : जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या पंचायत राज समितीने पहिल्याच दिवशी अधिकाºयांची झाडाझडती घेतली. ग्रामविकास आणि शिक्षण विभागाच्या सचिवांना साक्षीसाठीही बोलावण्याचे आदेश समितीने दिले असून वडणगे पाणी योजनेवरून जोरदार फैरी झडल्याचे समजते.
सुधीर पारवे यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती तीन दिवसांच्या दौºयावर आली आहे. सकाळी शासकीय विश्रामगृहावर पदाधिकाºयांशी चर्चा केल्यानंतर समिती जिल्हा परिषदेमध्ये आली. वसंतराव नाईक समिती सभागृहामध्ये अधिकाºयांच्या बैठकीला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच आमदारांनी आक्रमक भूमिका घेऊन २0१३/१४ च्या लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवालातील परिच्छेदासंदर्भात अधिकाºयांच्या साक्षी घेतल्या.
शिक्षण, ग्रामपंचायत, बांधकाम, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा विभागांच्या परिच्छेदावर यावेळी जोरदार आक्षेप घेण्यात आले. त्या-त्या वेळी या विभागांचे काम पाहणारे अधिकारीही यावेळी उपस्थित होते. शिक्षण आणि ग्रामपंचायत विभागाच्या प्रश्नांबाबत समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने अखेर या विभागाच्या सचिवांना साक्षीला बोलावण्याचे आदेश समितीने दिले.
या दरम्यान वडणगे पाणी योजनेच्या मुद्द्यावर समितीने कारभाराचा पंचनामाच केला. कंत्राटदारावर कारवाई केली की नाही, ती लवकर का केली नाही, किती वेळा निवेदने द्यावी लागली, अशी प्रश्नांची सरबत्तीच यावेळी करण्यात आली. अखेर याबाबतची कागदपत्रे मागवून संबंधित कंत्राटदाराकडून आवश्यक ती रक्कम वसूल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. काही प्रकरणांमध्ये एक महिन्यात अहवाल देण्याचे आदेश समितीने दिल्याचे समजते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी शिवदास यांच्यासह सर्व विभागप्रमुख आणि काही विभागांचे बदलून गेलेले अधिकारीही यावेळी उपस्थित होते.
समितीच्या एकूण २८ आमदारांपैकी १२ जण आले असून, आणखी दोन आमदार आज, गुरुवारी कामकाजात सहभागी होणार आहेत. गुरुवारी जिल्हाभर दौरा करण्यासाठी चार उपसमित्या करण्यात आल्या आहेत. गगनबावडा, राधानगरी, भुदरगडसाठी एक; शाहूवाडी, पन्हाळा, करवीरसाठी दुसरी; हातकणंगले, शिरोळ, कागलसाठी तिसरी; तर आजरा, गडहिंग्लज, चंदगडसाठी चौथी अशा समित्या तयार करण्यात आल्या असून त्यांच्यासमवेत अधिकारीही देण्यात आले आहेत.कोल्हापूरच्या दौºयावर आलेल्या पंचायती राज समितीने बुधवारी दिवसभर जिल्हा परिषदेच्या समिती सभागृहात विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला.
रांगोळींची सजावट, पण वातावरणात तणाव
समितीच्या स्वागतासाठी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारापासून बैठकीच्या सभागृहापर्यंत रांगोळी काढण्यात आली होती. लिफ्टमधून बाहेर पडल्यानंतर समिती सभागृहात जाण्यासाठी पायघड्याही घालण्यात आल्या होत्या. ठिकठिकाणी झाडांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. सर्व सदस्यांचे शाल, श्रीफळ आणि चाफ्याचे झाड देऊन स्वागत करण्यात आले. सभागृहातही फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. असे असले तरी दिवसभर जिल्हा परिषदेमध्ये तणावाचेच वातावरण होते. सर्व अधिकारी आणि वरिष्ठ कर्मचारी दिवसभर तिसºया मजल्यावर धावपळीत होते.