पंचायत समिती देशात अग्रेसर करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2017 10:09 PM2017-02-17T22:09:44+5:302017-02-17T22:09:44+5:30
हसन मुश्रीफ : एकदा सत्ता द्यावी; वंदूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचारसभा
कागल : कागल तालुक्यातील जनतेने जेथे मला संधी दिली तेथे मी त्या संधीचे सोने करीत सामान्यांचे जीवनमान उंचावले आहे. इतरांपेक्षा सरस काम करून दाखविले आहे. आता एकदा ही पंचायत समितीची सत्ता माझ्याकडे द्या; कागलची पंचायत समिती देशात अग्रेसर केल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.
वंदूर (ता. कागल) येथील प्रचारसभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाळासो घाटगे होते. यावेळी उमेदवार रमेश तोडकर, धनाजीराव घाटगे, केरबा चौगुले, तानाजी बागले, वसंतराव पाटील, बाबूराव हांचनाळे, पारिसा जंगटे, बबन खोडवे, डॉ. रणदिवे, आदी उपस्थित होते. ‘कर्जमाफी’ची लढाई लढल्याबद्दल आमदार मुश्रीफ यांचा यावेळी सत्कार झाला.
आमदार मुश्रीफ म्हणाले की, निवडून दिलेले उमेदवार तुम्ही कोठे पाहिलेत का? एकदा निवडून गेले की फिरकायचेच नाही, हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. त्यामुळे आता वंदूरकरांनी सावधपणे मतदार करावे, आम्हाला सत्ता आमच्या घरात पद ठेवण्यासाठी नको आहे. आजवर जे काही मिळाले ते कार्यकर्ते आणि जनतेला मानसन्मान देण्यासाठीच उपयोगी आणले आहे. निराधार योजना, मोफत आॅपरेशन, मुबलक रेशनधान्य, रुग्णवाहिका, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, रोजगार निर्मिती, अशी कितीतरी कामे केली ते सांगू शकतो.
मात्र ३५ वर्षे पंचायत समिती ताब्यात असणाऱ्या संजय घाटगेंनी काय केले? याचा जाब तुम्ही विचारला पाहिजे. मी आणि माझे उमेदवार आणि शिवसेना व भाजपचे उमेदवार याची तुलना करा, यावेळी स्वागत उत्तम कांबळे यांनी, प्रास्ताविक कुंडलिक खोडव यांनी, तर आभार एम. एस. कांबळे यांनी मानले. (प्रतिनिधी)
व्हनाळीला सहली काढा
आमदार मुश्रीफ म्हणाले की ३५ वर्षे संजय घाटगे यांच्याकडे पंचायत समितीची सत्ता आहे. पण त्यांचे गाव असणारी व्हन्नाळी अजूनही आदिवासी गावासारखीच दिसते. एक निष्क्रीय लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या निष्क्रियतेचा पुरावा पाहण्यासाठी आता व्हन्नाळीला सहली काढा.