Kolhapur: ५१ हजार दिव्यांनी उजळला पंचगंगा घाट, दीपावली पर्वाची सांगता
By संदीप आडनाईक | Published: November 15, 2024 06:58 PM2024-11-15T18:58:21+5:302024-11-15T19:00:27+5:30
'लोकमत’ने गतवर्षी फटकारल्याने यावर्षी आयोजकांनी लेसर शोला फाटा दिला
कोल्हापूर : प्रसन्न पहाट सोबतील संथ वाहणारी पंचगंगा नदी, आकर्षक भव्य प्रबोधनात्मक रांगोळ्यांची सजावट आणि जोडीला समाधी मंदिरावरील ५१ हजार दिव्यांचा झगमगाट, नयनरम्य विद्युतरोषणाई, आतषबाजीने सप्तरंगांत उजळलेला आसमंत अशा तेजोवलयात पंचगंगेचा काठ आज, शुक्रवारी पहाटे उजळला. त्रिपुरारी पौर्णिमेला जलाशयांसह मंदिरांमध्ये दीप प्रज्वलित करून प्रथेनुसार या दीपावली पर्वाची सांगता झाली.
पंचगंगा नदीघाट परिसरात ‘शिवमुद्रा प्रतिष्ठान’तर्फे हा सोहळा पार पडला. पहाटे चार वाजता दीपपूजनाने दीपोत्सवास प्रारंभ झाला. राष्ट्रपती पुरस्कार विजेते सागर बगाडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. नदीघाटांसह ब्रह्मपुरी, महादेव मंदिर, कृमकेश्वर मंदिर, रावणेश्वर, पिकनिक पॉइंट परिसरातील दीपमाळांवर नागरिकांनी दिवे प्रज्वलित करण्यास सुरुवात केली.
नदीपात्रातील समाधी मंदिरावरही पणत्यांचा उजेड पडल्यामुळे हा परिसर नयनरम्य दिसत होता. व्हाइट आर्मीच्या जवानांसोबत पेठेतील सर्व तालीम संस्था, महानगरपालिका या दीपोत्सवाच्या आयोजनात सहभागी झाले होते. संदीप देसाई, अतुल वस्ताद, अक्षय मिठारी, राजू कायदे, नीलेश जाधव, अवधूत कोळी, दीपक देसाई, प्रवीण चौगुले, अविनाश साळोखे, विनोद हजारे, वैभव कवडे, साेहम कुऱ्हाडे यांनी यासाठी परिश्रम घेतले.
लक्षवेधी प्रबोधनात्मक रांगोळ्या
दीपोत्सवासह पंचगंगा नदीघाट परिसरात प्रबोधनात्मक रांगोळ्या काढल्या होत्या. यात केशवराव भोसले नाट्यगृहाची प्रतिकृती, अंबाबाई देवीची तसेच संस्कार भारतीच्या भव्य रांगोळ्या रेखाटलेल्या होत्या. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृती करणाऱ्या रांगोळीसह एक ना अनेक लक्षवेधी रांगोळ्यांमधून प्रबोधन करण्यात येत होते.
भक्तिगीतांनी वाढवली दीपोत्सवाची रंगत
आकार प्रस्तुत अंतरंगच्या ‘स्वरदीपोत्सव’तर्फे भावगीत आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम तब्बल अडीच तास रंगला. महेश हिरेमठ आणि शुभांगी जोशी यांनी गणपती स्तोत्र ‘सूर निरागस हो’ या गाण्याने सुरुवात केली. उत्तरोत्तर रंगलेल्या या मैफलीत ‘अंबाबाईची भूपाळी’, ‘गोंधळ’, ‘गणपती भूपाळी’, ‘शेतकरी गीते’ सादर करण्यात आली. पंढरीचा राया, उठी श्रीरामा, निघालो घेउनी, गुरू परमात्मा परेशू, फिटे अंधाराचे जाळे या गाण्यानंतर मल्हारवारी या देवीच्या गोंधळ गीताने सांगता झाली. त्यांना प्रदीप जिरगे, स्वानंद जाधव, महेश कदम आणि श्रीधर जाधव यांनी साथ केली. स्वप्नील पन्हाळकर यांनी निवेदन केले.
लेसर शोला फाटा
‘लोकमत’ने गतवर्षी फटकारल्याने यावर्षी आयोजकांनी लेसर शोला पूर्णपणे फाटा दिला होता. त्यामुळे पारंपरिक दीपोत्सवाचा निर्भेळ आनंद नागरिकांनी लुटला.