शिरोळ तालुक्यात पंचगंगा काळीकुट्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:57 AM2019-04-26T00:57:11+5:302019-04-26T00:57:16+5:30

कुरुंदवाड : पंचगंगा नदीला काळेकुट्ट पाणी आले असून, पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. दूषित पाण्यामुळे पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात ...

Panchganga Kalyukut in Shirol taluka | शिरोळ तालुक्यात पंचगंगा काळीकुट्ट

शिरोळ तालुक्यात पंचगंगा काळीकुट्ट

Next

कुरुंदवाड : पंचगंगा नदीला काळेकुट्ट पाणी आले असून, पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. दूषित पाण्यामुळे पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, दूषित पाण्याचा प्रश्न कधी सुटणार, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.
पंचगंगा नदी शिरोळ तालुक्यासाठी जीवनदायी आहे. मात्र, नदीपात्रात औद्योगिक कारखान्यांचे सांडपाणी, मैलायुक्त सांडपाण्यामुळे नदी पूर्णपणे प्रदूषित बनली आहे. त्यातच नदीपात्राला जलपर्णीचा विळखा, आदी कारणांमुळे जीवनदायी नदी मरणदायी ठरली आहे.
पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी आंदोलन केले. मात्र, ही आंदोलने काही काळापुरतीच केल्याने प्रश्न तसाच राहिला. काही महिन्यांपूर्वी आमदार उल्हास पाटील यांनी पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी जागर यात्रा काढली. संगम ते उगमापर्यंत पदयात्रेतून पंचगंगा काठच्या नागरिकांना जागे, तर नदी प्रदूषण करणारे घटक, प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाला इशारा देण्यात आला. या आंदोलनामुळे नदी प्रदूषण मुक्तीकडे वळेल, अशी आशा होती. मात्र, जागर मोर्चा हा केवळ आंदोलनापुरताच राहिला. पुन्हा ये रे माझ्या मागल्या... या उक्तीप्रमाणे आमदारांना व प्रदूषण नियंत्रण मंडळालाही याचा विसर पडला आहे.
सध्या तीव्र उन्हाळा जाणवत असताना व पात्रातील पाण्याचे प्रमाण कमी झाले असताना औद्योगिकीकरणाचे व सांडपाणी थेट नदीत सोडल्यामुळे नदीपात्रातील पाणी काळेकुट्ट बनले असून, पाण्याला उग्र वास येत आहे. धरणातून पाणी सोडले तरी पाण्याच्या प्रवाहाबरोबर सांडपाणी पुढे ढकलत येऊन शिरोळ तालुक्यात स्थिरावते. त्यामुळे दूषित पाण्याचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीकाठावरील गावांना बसत आहे. याबाबत नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Panchganga Kalyukut in Shirol taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.