पंचगंगेच्या पातळीत साडे सहा फुटांची वाढ, संततधार पाऊस, ९४ बंधारे पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 12:53 PM2020-08-17T12:53:47+5:302020-08-17T13:24:54+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन दिवस संततधार पाऊस सुरू असून धरणक्षेत्रातही धुवादार पाऊस सुरू आहे. धरणांतून विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असून दिवसभरात पंचगंगा नदीच्या पातळीत तब्बल साडे सहा फुटांनी वाढ झाली. पंचगंगेने पुन्हा इशारा पातळीकडे आगेकूच केल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शाहूवाडी तालुक्यातील कडवी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यात गेले दोन दिवस संततधार पाऊस सुरू असून धरणक्षेत्रातही धुवादार पाऊस सुरू आहे. धरणांतून विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असून दिवसभरात पंचगंगा नदीच्या पातळीत तब्बल साडे सहा फुटांनी वाढ झाली. पंचगंगेने पुन्हा इशारा पातळीकडे आगेकूच केल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शाहूवाडी तालुक्यातील कडवी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.
गेले दोन दिवस गगनबावडा, चंदगड, आजरा, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यांत मुसळधार; तर उर्वरित तालुक्यांत जोरदार पाऊस कोसळत आहे. गगनबावडा तालुक्यात १२४.५०, चंदगड तालुक्यात १३०. ८३, तर आजरा तालुक्यात ११६.२५ मिलिमीटर पाऊस झाला. शाहूवाडी तालुक्यातील कडवी धरण भरले असून कडवी, कासारी, कुंभी, तुळशी, भोगावतीसह पंचगंगा नदीचे पाणी झपाट्याने वाढत आहे.
जिल्ह्यात सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत पंचगंगेची पातळी ३७ फुटांपर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत ९४ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. राधानगरीचे पाच स्वयंचलित दरवाजे खुले झाले असून वारणा धरणातून १४ हजार ४८६ व दूधगंगा धरणातून १२ हजार ९५० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
राजाराम बंधारा पाणी पातळी ३७ फूट ७ इंंच इतकी आहे. (पंचगंगा नदी इशारा पातळी - ३९ फूट व धोका पातळी - ४३फूट आहे) एकुण पाण्याखालील ९४ बंधारे आहेत. राधानगरी धरणाचे तीन, पाच, सहा आणि चार हे स्वयंचलित दरवाजे उघडले असुन विसर्ग ७११२ क्युसेक आहे. तुळशी- ८८४, वारणा-१४४८६, दुधगंगा- १२९५०, कासारी- १७५०, कडवी -२५१९, कुंभी - ६५०, पाटगाव - १०७२ , चित्री -२००५, जंगमहट्टि- ६३४ , घटप्रभा -२७२४, जांबरे-२२६५ आणि कोदे येथून ८१८ क्युसेक विसर्ग सुरु आहे.
राजापूर बंधारा पाणी पातळी ४१ फुट ० इंच आहे (धोका पातळी : ५८ फुट इशारा पातळी: ५३ फुट)
नृसिंहवाडी पाणीपातळी सध्या ५० फुट ० इंच आहे (धोका पातळी ६८ फुट इशारा पातळी ६५ फुट)
शिरोळ पाणीपातळी सध्या ५२'६"फुट आहे (धोका पातळी : ७८ फुट इशारा पातळी-: ७४ फुट आहे)
इचलकरंजी पाणीपातळी सध्या ६० फुट ६ इंच आहे( धोका पातळी : ७१ फुट इशारा पातळी-: ६८ फुट )
तेरवाड पाणी पातळी सध्या ५५ फुट ० इंच आहे( धोका पातळी : ७३ फुट इशारा पातळी -: ७१ फुट)
कोयना धरण पाणी पातळी ६५६.३८७ मी सध्या ९२.३९ टि .एम्. सि ( ८७.७४ टक्के) आवक ११४९८०, जावक विसर्ग ५५९५८ आहे अलमट्टि पाणी पातळी सध्या ५१८.८० मी, १०९.७६ टि.एम.सि.आहे आवक १२७५८२ व जावक विसर्ग २५०००० आहे.
पावसाला गारठा!
डोंगरभागात तर पाऊस सुपाने ओतल्यासारखा पडत असल्याने माणसांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. त्यात या पावसाला कमालीचा गारठा जाणवत असल्याने दिवसभर अंगातून हुडहुडी जात नाही.
मघा झटका देणार?
मागील नक्षत्र काळात शेतीस उपयुक्त पाऊस झाला. गेले १५ दिवस कमी-अधिक प्रमाणात पाऊस राहिला. सूर्याने रविवारी सायंकाळी सात वाजून ११ मिनिटांनी मघा नक्षत्रात प्रवेश केला आहे. त्याचे वाहन म्हैस असून या काळात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
२० सर्कलमध्ये अतिवृष्टी
जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत जोरदार पाऊस कोसळत असून ७६ पैकी २० महसुली सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली आहे. शाहूवाडी व चंदगड तालुक्यांतील प्रत्येकी पाच सर्कलचा यामध्ये समावेश आहे.
पडझड १६.५२ लाखांचे नुकसान
आजरा, चंदगड, गडहिंग्लज, शाहूवाडी तालुक्यांत २८ खासगी मालमत्तांची पडझड होऊन १६ लाख ५२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घरांची सर्वाधिक पडझड आजरा व चंदगड तालुक्यांत झालेली आहे.
कोल्हापूरकर पुन्हा धास्तावले
गेले दोन दिवस धुवाधार पाऊस सुरू आहे. त्यात धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने पुन्हा महापुराचे संकट समोर आहे. त्यामुळे कोल्हापूरकर धास्तावले आहेत.
दृष्टिक्षेपात दिवसभरातील पाऊस
- पंचगंगेच्या पातळीत वाढ - ३५ फूट
- बंधारे पाण्याखाली - ९४
- मार्ग बंद - सहा
धरणातील वाढलेला विसर्ग प्रतिसेकंद घनफूट :
- राधानगरी - १४२८
- वारणा - १५०२
- दूधगंगा - ९४५०
हातकणंगले- २५.२५(४३१.६३), शिरोळ- २०.७१ (३५४), पन्हाळा- ६९.४३ (१२१८.५७), शाहूवाडी- ७३ (१५१५), राधानगरी- ८९ (१६५२.८३), गगनबावडा-१२४.५० (४१३३), करवीर- ६७.५५ (८९१.२७), कागल-६१.७१(१०९६.८६), गडहिंग्लज- ६०.४३ (७७७.४३), भुदरगड-९४.४०(१२६७.४०), आजरा- ११६.२५(१७९८.७५), चंदगड- १३०.८३(१८६६.१७)