कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पावसामुळे पंचगंगा पात्राबाहेर; ५८ बंधारे पाण्याखाली, वाहतूक विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 01:44 PM2023-07-20T13:44:13+5:302023-07-20T19:06:33+5:30
दिवसभरात तब्बल ५ फुटाने पातळी वाढली
कोल्हापूर : जिल्ह्यात आज पावसाचा जोर कमी होता. सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु होती तर काही वेळ उघडीपही दिली. मात्र धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढच होत होती. आज, तब्बल ५८ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीतच राहिली.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जाेर वाढला आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, चंदगड तालुक्यांत धुवांधार पाऊस सुरू आहे. धरण क्षेत्रात तर तुफान पाऊस कोसळत असल्याने पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे.
राधानगरी धरण ६० टक्के भरले
राधानगरी धरण ६० टक्के भरल्याने बुधवारी दिवसभरात वीज निर्मितीसाठी सोडण्यात येणारा विसर्ग वाढविला आहे. त्यामुळे ‘भोगावती’, ‘कुंभी’, ‘कासारी’सह जिल्ह्यातील सर्वच नद्यांचे पाणी सकाळी पात्राबाहेर आले. पंचगंगेची पातळी सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत तब्बल ५ फुटाने वाढली. रात्री उशिरा पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडले.
धरण क्षेत्रात सरासरी १३५ मिलिमीटर पाऊस
धरण क्षेत्रात एकसारखा मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत धरण क्षेत्रात सरासरी १३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पाटगाव धरण क्षेत्रात २९५, घटप्रभा धरण क्षेत्रात २५२ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
दोन दिवस ऑरेंज अलर्ट
जिल्ह्यात आगामी दोन दिवस ऑरेंज अलर्ट असून, पावसाचा जोर कायम राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
शेतकरी सुखावला...
खरीप पिकांसह भाताच्या रोप लागणीसाठी जोरदार पावसाची गरज होती. गेले दोन दिवस सुरू असलेल्या धुवाॅंधार पावसाने शेतीकामांना वेग आल्याने शेतकरी सुखावल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
अलमट्टीमध्ये २१ हजार घनफूट पाण्याची आवक
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने सगळ्यांच्या नजरा अलमट्टी धरणाकडे लागल्या आहेत. बुधवारी अलमट्टी धरणात प्रति सेकंद २१ हजार ६७२ घनफूट पाण्याची आवक होत आहे.