पंचगंगा प्रदुषणाचा फटका, मच्छिमारांची जाळी अन् झोळी रिकामी; लाखो रुपयांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 12:12 PM2022-03-05T12:12:38+5:302022-03-05T12:13:27+5:30
मोठ्या प्रमाणावर मासे मेल्यामुळे मच्छिमारांच्या मिळकतीचाही प्रश्न
समीर देशपांडे
कोल्हापूर : पंचगंगा ही रसायनगंगा झाल्यामुळे केवळ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अशातील भाग नाही. तर त्यामुळे अन्य प्रश्नही निर्माण झाले आहेत. कधी नव्हे ते यंदा मोठ्या प्रमाणावर मासे मेल्यामुळे मच्छिमारांच्या मिळकतीचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांचा यंदाचा हंगामच वाया गेला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
वसगडे एक नंबर पंप ते रुई धरणापर्यंत भादोले मच्छिमार सोसायटीच्या सभासदांना मासे गोळा करण्यासाठी परवानगी आहे. यामधील बहुसंख्य मच्छिमार हे रुकडी गावातील आहेत. ५० जण या हंगामामध्ये मासे गोळा करून त्याची विक्री करतात. प्रत्येकाला किमात हजार,पंधराशेहे रुपये मिळतात. यात कधी कमी जास्त फरकही पडतो. तीन महिने हे काम चालते.
याच पट्ट्यात पंचगंगा रसायनयुक्त झाल्याने मासे मेले आणि त्याचा थेट फटका या सर्वांना बसणार आहे. प्रत्येकाचे किमान या हंगामातील पन्नास हजारांपासून लाख रुपयांपर्यंतचे नुकसान झाले आहे. दोन महिने घरात बसून काढण्याची वेळ आता या मच्छिमारांवर येणार आहे.
कारण ज्या पद्धतीने हे मासे मरून पडले आहेत. ते पाहता या परिसरातील ग्रामस्थांनी मासे विकत घेणे बंद केले आहे. मुळात या पट्ट्यात आता नव्याने माशांची पैदास होणार कधी, रसायनयुक्त पाणी खाली जाणार कधी असे अनेक प्रश्न या मच्छिमारांसमोर आहेत.
जाळ्या झाल्या तेलकट
यातूनही काही मच्छिमारांनी काही जिवंत मासे आहेत का, हे पाहण्यासाठी जाळ्या लावल्या होत्या. परंतू मेलेल्या माशांच्या तेलामुळे या जाळ्याच तेलकट होऊन बाहेर येत आहेत. त्यामुळे हा प्रयत्नही थांबवण्यात आला आहे.
पंचगंगेच्या प्रदूषणामुळे मासे मेले. परंतू त्याचा मोठा आर्थिक फटका आम्हांला बसला आहे. दरवर्षी आम्ही सर्वजण लाखो रुपयांचे मासे विकतो. परंतू ऐन हंगामातच मासे मेल्यामुळे आता दोन महिने घरात बसून काढण्याशिवाय आमच्यासमोर पर्याय नाही. शासनाच्या दुर्लक्षामुळे प्रदूषण झाले. मासे मेले. आता आम्हांला किमान नुकसानभरपाई तरी मिळावी अशी आमची मागणी आहे. -रमेश बागडी, मच्छिमार, रुकडी