पंचगंगा नदी इशारा पातळीकडे, कोल्हापूर जिल्ह्यातील ७९ बंधारे पाण्याखाली; २८ मार्गावरील वाहतूक बंद
By राजाराम लोंढे | Published: July 20, 2024 03:56 PM2024-07-20T15:56:01+5:302024-07-20T15:56:32+5:30
अनेक मार्गावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आज, शनिवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरु आहे. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत आहे, त्यात धरणातून विसर्ग सुरु असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पुराचे पाणी हळूहळू नदीकाठच्या गावात घुसू लागल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील ७९ बंधारे व अनेक मार्ग पुराच्या पाण्याखाली गेल्याने वाहतूक काहीसी विस्कळीत झाली आहे. पंचगंगा ३६ फुटाच्या वरुन वाहत असून इशारा पातळीकडे आगेकुच सुरु ठेवली आहे.
शुक्रवारी दिवसभर एक सारखा पाऊस कोसळत राहिला. रात्रभर पाऊस एक सारखा सुरु होता, शनिवारी दिवसभरही रिपरिप कायम राहिली. धरणक्षेत्रातही धुवांधार पाऊस कोसळत असल्याने विसर्गही वाढला आहे. राधानगरीतून प्रतिसेंकद १४५०, घटप्रभा मधून ८४३४, वारणा धरणातून १३९६ तर कोदे मधून ८१८ घनफुट पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. पंचगंगा नदीची पातळी ३६ फुटाच्या वर गेली असून इशारा पातळीकडे वाटचाल सुरु केल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वारे आणि पावसाने अंगात हुडहुडी
शुक्रवारी रात्री नऊ पासून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत होता. वारा आणि पावसामुळे अंगात हुडहुडी भरली होती.
पुराच्या पाण्याने २८ मार्ग बंद
जिल्ह्यात सर्वच नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने वाहतूकीचे मार्ग बंद झाले आहेत. राज्य मार्ग ५, प्रमुख जिल्हा मार्ग ११ तर ग्रामीण मार्ग १२ असे २८ मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. त्याचबरोबर गडहिंग्लज, गारगोटी व चंदगड तालुक्यातील एस. टी. चे तीन मार्ग बंद राहिले आहेत.