पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:29 AM2021-09-15T04:29:12+5:302021-09-15T04:29:12+5:30
इचलकरंजी : धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा सुरू झालेला पाऊस आणि कोयना व राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणातील पाण्याचा विसर्ग यामुळे ...
इचलकरंजी : धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा सुरू झालेला पाऊस आणि कोयना व राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणातील पाण्याचा विसर्ग यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यंदा तिसऱ्यांदा पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून, जुन्या पुलाला पाणी लागले आहे.
पावसाळ्याला सुरुवात झाल्यापासून पंचगंगा नदीला तिसऱ्यांदा पूर आला आहे. नदीकाठावरील संपूर्ण घाट पाण्याखाली गेला आहे. मागील काही दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रासह कोकणात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यातच कोयना आणि राधानगरीसह सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरली असल्याने आता पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. कोयना आणि राधानगरी धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत चालली आहे. पाणी पातळीत वाढ होत राहिली, तर पुन्हा एकदा पुराची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
फोटो ओळी
१४०९२०२१-आयसीएच-०७
इचलकरंजीत नदीकाठावरील संपूर्ण घाट पाण्याखाली गेला आहे.