पंचगंगा पुन्हा पात्राबाहेर; कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरीसह आजरा, गगनबावड्यात अतिवृष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 12:17 PM2024-08-27T12:17:58+5:302024-08-27T12:19:12+5:30
धरण क्षेत्रातही धुवाधार पाऊस, विसर्ग वाढला
कोल्हापूर : जिल्ह्यात गेले दोन दिवस जोरदार पाऊस कोसळत आहे. राधानगरी, गगनबावडा, आजरा व चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, धरण क्षेत्रातही धुवाधार पाऊस होत आहे. सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरली असल्याने, पाण्याचा विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी ३४.०२ फुटांच्या वर गेली असून, पाणी पुन्हा पात्राबाहेर फेकले गेले आहे. आता इशारा पातळीकडे (३९ फूट) आगेकूच ठेवली असून, कोल्हापूरकरांची पुन्हा धाकधूक वाढली आहे. दिवसभरात तब्बल ६ फुटांनी वाढ झाल्याने ४४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
शनिवारपासून जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला आहे. रविवारपासून मात्र पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. सोमवारी सकाळपासून एकसारख्या सरी कोसळत आहेत. वाऱ्यासह जोरदार सरी येत असल्याने पाणी पाणी होत आहे. राधानगरीसह चार तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. धरण क्षेत्रातही धुवाधार पाऊस होत असल्याने विसर्ग वाढला आहे. राधानगरी धरणाचे चार दरवाजे खुले होते. सोमवारी सकाळी एक स्वयंचलित दरवाजा बंद झाला असून, तीन दरवाजे सुरू आहेत.
सध्या धरणातून प्रतिसेकंद ५,७८४ घनफूट पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सुरू असल्याने, नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता पंचगंगेची पातळी २६ फुटांपर्यंत होती. रात्री १० वाजता ती ३२ फुटांपर्यंत पोहोचली होती. पाणी वाढण्याचा वेग इतका जोरात होता की, दिवसभरात तब्बल ६ फुटांनी पाणी पातळीत वाढ झाली. पंचगंगेसह भोगावती, कुंभी, कासारी नदीचे पाणी पुन्हा पात्राबाहेर पडले आहे. तब्बल ४२ बंधारे पाण्याखाली असल्याने वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे.
दहा सर्कलमध्ये अतिवृष्टी
जिल्ह्यातील राधानगरी, सरवडे, कसबा वाळवे, राशिवडे, कडगाव, आजरा, गवसे, हेरे, नागणवाडी, चंदगड या सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली आहे. विशेष म्हणजे येथे ८० ते १०० मिलीमीटर पाऊस झाला आहे.
वार्षिक सरासरीच्या ७४ टक्के पाऊस
जिल्ह्याच्या ऑगस्ट अखेरच्या सरासरी पावसाच्या ८७ टक्के, तर वार्षिक सरासरीच्या ७४ टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे. गेल्या वर्षी केवळ ५६ टक्केच पाऊस होता.
पडझडीत ७.१५ लाखांचे नुकसान
जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत २९ खासगी मालमत्तांची पडझड झाली. यामध्ये ७ लाख १५ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
असा सुरू आहे धरणातील विसर्ग, प्रतिसेकंद घनफूट
राधानगरी : ५,७८४
तुळशी : १,०००
वारणा : १,४६५
दूधगंगा : १,०००
कासारी : ९००
कुंभी : १,०००
पाटगाव : १,५८८
घटप्रभा : ६,४८०