पंचगंगा नदीचे पाणी फुटाने कमी; कोल्हापूर जिल्ह्यातील चौदा बंधारे खुले, वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 02:07 PM2024-08-06T14:07:25+5:302024-08-06T14:08:11+5:30

अधूनमधून श्रावण सरी : राधानगरीचा विसर्गही झाला कमी

Panchganga river water reduced by a foot; Fourteen dams in Kolhapur district open, traffic slowly back to normal | पंचगंगा नदीचे पाणी फुटाने कमी; कोल्हापूर जिल्ह्यातील चौदा बंधारे खुले, वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

छाया-आदित्य वेल्हाळ

कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची उघडझाप राहिली. अधूनमधून जोरदार श्रावण सरी कोसळत राहिल्या, पण गेल्या आठ-दहा दिवसात पहिल्यांदाच पंचगंगेचे पाणी एक फुटाने कमी झाले. त्यामुळे दिवसभरात चौदा बंधारे पाण्याखालून मोकळे झाले आहेत. राधानगरीचा सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा दुपारी बंद झाल्याने विसर्ग कमी झाल्याने पुराची पातळी कमी होत आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ९.३ मिलिमीटर पाऊस झाला. धरणक्षेत्रातही तुलनेत पाऊस कमी असल्याने विसर्ग कमी झाला आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले होते, त्यातून प्रतिसेकंद ४३५६, तर वारणा धरणातून ११ हजार ५८० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र, दुपारनंतर राधानगरीचा एक दरवाजा कमी झाल्याने २८५६ घनफूट व वारणातून २९०५ घनफूट विसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे दिवसभरात पंचगंगा नदीची पातळी फुटाने कमी झाली आहे.

पाऊस कमी तरीही ४७ पडझडी

गेल्या चार दिवसांपासून पाऊस कमी झाला आहे, तरीही पडझड थांबण्याचे नाव घेत नाही. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात ४७ मालमत्तांची पडझड होऊन १५ लाख २४ हजारांचे नुकसान झाले आहे.

एस. टी.ची चाके हळूहळू पूर्वपदावर

पुराच्या पाण्याने एस. टी. महामंडळाचे मोठे नुकसान झाले आहे. सोमवारपासून एस. टी.ची चाके हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहेत. आता दहा मार्ग पूर्ण, तर तीन अंशता बंद आहेत. या मार्गावर पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.

Web Title: Panchganga river water reduced by a foot; Fourteen dams in Kolhapur district open, traffic slowly back to normal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.