पंचगंगा धोक्याच्या खाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:25 AM2021-07-29T04:25:25+5:302021-07-29T04:25:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिल्याने पुराचे पाणी हळूहळू ओसरु लागले आहे. पंचगंगा नदी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिल्याने पुराचे पाणी हळूहळू ओसरु लागले आहे. पंचगंगा नदी धोका पातळीच्या खाली आली असून, राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. त्यामुळेही आता पुराचे पाणी कमी होण्यास मदत होणार आहे. पंचगंगेचे पाणी अजूनही अथांग पसरलेले आहे.
बुधवारी सकाळपासून उघडीप राहिली. काही तालुक्यात अधूनमधून जोरदार सरी कोसळत असल्या तरी त्याला जोर नव्हता. पावसाने उघडीप दिली असली तरी पुराचे पाणी संथ गतीने ओसरु लागले आहे. राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बुधवारी बंद झाल्याने भोगावती नदीत होणारा विसर्ग थांबला आहे. अद्याप ४७ बंधारे पाण्याखाली असून, या मार्गावरील वाहतूक विस्कळीत आहे.
पाऊस थांबल्याने पुराचे पाणी ओसरु लागले असले तरी अजूनही पंचगंगेचे पाणी अथांग पसरलेले आहे. पंचगंगेची धोका पातळी ४३ फूट असून, बुधवारी रात्री ४२.८ फुटापर्यंत पातळी आली होती.
पडझड अजूनही सुरूच
जिल्ह्यात पाऊस थांबला असला तरी सार्वजनिक व खासगी मालमत्तांची पडझड सुरूच आहे. बुधवारी एक सार्वजनिक व १३५ खासगी मालमत्तांची पडझड होऊन सुमारे ५५ लाख ७२ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
अद्याप पिके पाण्याखालीच
नदी व ओढ्याच्या काठावरील पिके अद्याप पाण्याखालीच आहेत. अनेक ठिकाणी ऊस, भात, सोयाबीन पिके कुजण्यास सुरुवात झाली असून, दुर्गंधी पसरु लागली आहे.
फोटो ओळी : कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस थांबला असला तरी महापुराचे पाणी हळूहळू ओसरत आहे. त्यामुळे पंचगंगेचे पाणी अजूनही अथांग पसरले आहे. (फोटो-२८०७२०२१-कोल-पंचगंगा महापूर) (छाया- आदित्य वेल्हाळ)