पंचगंगेच्या पातळीत दीड फुटाने वाढ : १४ बंधारे पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 12:02 PM2019-07-06T12:02:36+5:302019-07-06T12:04:10+5:30
जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून, नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून, नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीच्या पातळीत २४ तासांत दीड फुटाने वाढ झाली असून, ती वाढ २० फुटांवर आहे. १४ बंधारे पाण्याखाली आहेत.
गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, आजरा व चंदगड तालुक्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ४५२.७२ मिलिमीटरची नोंद झाली आहे. आजरा व गगनबावडा तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. राधानगरी, तुळशी, दूधगंगा धरणक्षेत्रातही सरासरी ९० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. घटप्रभा धरणक्षेत्रात तब्बल १५४ मिलिमीटर पाऊस झाला. हे धरण पूर्णक्षमतेने भरले असून, प्रतिसेकंद ३५२२ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोदे धरण ६४, तर कडवी धरण ४४ टक्के भरले आहे. राधानगरी व तुळशी ३५ टक्के, तर वारणा २९ व दूधगंगा १६ टक्के भरले आहे.
नद्यांच्या पातळीत वाढ होत असून, पंचगंगेची पातळी २० फुटांपर्यंत पोहोचली आहे. पंचगंगा नदीवरील सात, भोगावती नदीवरील तीन, वेदगंगा नदीवरील चार असे १४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत; यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.
तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा-
हातकणंगले (६.३८), शिरोळ (६.२९), पन्हाळा (२०.४३), शाहूवाडी (४०.५०), राधानगरी (४६.१७), गगनबावडा (८२), करवीर (२४.३६), कागल (२४.१४), गडहिंग्लज (२६.८६), भुदरगड (४६.६०), आजरा (८०), चंदगड (४९).