पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 01:42 PM2024-07-22T13:42:52+5:302024-07-22T13:44:55+5:30

७८ बंधारे पाण्याखाली; कोल्हापूर-गगनबावडा मार्ग ठप्प; नदीकाठचे नागरिक स्थलांतराच्या तयारीत 

Panchgange crossed the warning level, rain disrupted life in Kolhapur district | पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने जनजीवन विस्कळीत

छाया-नसीर अत्तार

कोल्हापूर : जिल्ह्यात काल, रविवारी सकाळपासून धुवाधार पावसामुळे पुराचे पाणी वाढू लागले आहे. आज, सोमवारी पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्याने कोल्हापूरकरांची धाकधूक वाढली आहे. पावसाचा जोर आणि धरणातून होणारा विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, स्थलांतराची तयारी सुरू केली आहे. तब्बल ७८ बंधारे पाण्याखाली गेले असून, कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावर सायंकाळी तीन ठिकाणी पाणी आल्याने मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

आज, सकाळपासून शहरात पावसाने उघडीप घेतली. काल, रविवार जिल्ह्यात संततधार पाऊस झाला. गगनबावडा, राधानगरी, चंदगड, शाहूवाडी, भुदरगड, पन्हाळा तालुक्यात अक्षरश: ढगफुटीसारखा पाऊस कोसळत आहे. धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस आहे. कोल्हापूर शहरात तर रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. एकसारखा पाऊस आणि हवेत कमालीचा गारठा जाणवत होता. राज्य, प्रमुख जिल्हा व ग्रामीण असे ३३ मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद झाल्याने जिल्ह्यातील जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे.

राधानगरी धरण ८० टक्के भरले असून, स्वयंचलित दरवाजाजवळ पाणी पोहोचले आहे. रविवारी दिवसरभरात धरणात तब्बल एक टीएमसी पाणी वाढल्याने रात्रभर असाच पाऊस राहिला तर आज, सोमवारी धरणाचे एक-दोन स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दरम्यान, पावसाचा जोर पाहता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून, आंबेवाडी, प्रयाग चिखली, आरे यासह पूरबाधित इतर गावांतील नागरिकांनी स्थलांतराची तयारी केली आहे. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्यानंतर स्थलांतर सुरू केले जाईल, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

‘राधानगरी’ ८०, तर ‘वारणा’ ७२ टक्क्यांवर

धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने जलाशयात झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत ‘जांबरे’, ‘घटप्रभा’, ‘जंगमहट्टी’, ‘आंबेओहोळ’ ही चार धरणे भरली आहेत. ‘कडवी’ ९५ टक्क्यांवर असून, ते कोणत्याही क्षणी भरू शकते. राधानगरी धरण ८० टक्के, तर वारणा ७२ टक्के भरले आहे. आणखी दोन दिवस असाच पाऊस सुरू राहिला; तर दोन्ही धरणे भरण्याची शक्यता आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याला महापुराला सामाेरे जावे लागणार आहे.

म्हणूनच पुराचे पाण्याला संथगती

‘राधानगरी’, ‘दूधगंगा’, ‘वारणा’ ही धरणे भरलेली नाहीत. ‘राधानगरी’ व ‘वारणा’तून वीजनिर्मितीसाठीच विसर्ग सुरू आहे. त्यात अलमट्टीतून विसर्ग प्रतिसेंकद सव्वा लाख घनफूट सुरू असल्याने पुराचे पाणी संथगतीने वाढत आहे. त्यामुळेच रविवारी दिवसभरात ‘पंचगंगे’ची पातळी अवघ्या दोन इंचांनी वाढली आहे.

आठवडी बाजारावरही परिणाम

कोल्हापूर शहरात रविवारी आठवडी बाजार असतो; पण दिवसभर सुरू असलेल्या संततधारेमुळे नागरिकांना घरातून बाहेर पडता येत नव्हते. त्यामुळे बाजारावरही पावसाचा परिणाम जाणवत होता.

  • बंधारे पाण्याखाली : ७८
  • पंचगंगेची पातळी : ३९.२ फूट
  • राज्य, प्रमुख जिल्हा व ग्रामीण मार्ग बंद : ३३
  • पडझड : ८ घरे ( सुमारे ६ लाखांचे नुकसान)

Web Title: Panchgange crossed the warning level, rain disrupted life in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.