‘पंचगंगे’ची आता धोका पातळीकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 01:01 AM2017-07-22T01:01:59+5:302017-07-22T01:01:59+5:30
गगनबावड्यासह पाच तालुक्यांत अतिवृष्टी सुरूच : जिल्ह्यातील ३७ मार्ग बंद; पंचगंगेची पातळी ४० फूट ४ इंचावर
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेला संततधार पाऊस व गगनबावड्यात पाच तालुक्यांत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पंचगंगेच्या पाणीपातळीने गुरुवारी (दि. २०) ३९ फुटांची इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे. रात्री आठ वाजता ४० फूट ४ इंच इतकी नोंदली गेली. यामुळे जिल्ह्यात पूर आला असून, ८२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत, तर ३७ राज्यमार्गांसह प्रमुख जिल्हा व ग्रामीण मार्ग बंद झाले असून, पर्यायी मार्गांनी वाहतूक सुरू आहे. गगनबावडा मार्गावरील किरवे येथे रस्त्यावर पाणी आल्याने गुरुवारी मध्यरात्रीपासून पाच प्रवासी बस व चार ट्रक यामधील सुमारे २५० लोक अडकून पडले. यातील काहींना शुक्रवारी प्रशासनाने बोटीद्वारे सुरक्षितस्थळी पोहोचविले.
गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून, शुक्रवारी सकाळी आठपर्यंत संपलेल्या २४ तासांत सरासरी ६१६.३६ मिलिमीटर पाऊस झाला. गगनबावड्यासह शाहूवाडी, राधानगरी, चंदगड, आजरा तालुक्यांत अतिवृष्टी झाली. धरणक्षेत्रात पावसाचा जोर राहिल्याने पंचगंगेसह इतर नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. शुक्रवारी पंचगंगेने इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू ठेवली. यामुळे जिल्ह्यात पूर आला. पंचगंगा नदीची पाणीपातळी दुपारी तीनपर्यंत ३९.१० इंचांवर गेली असून, धोका पातळी ४३ फूट इतकी आहे. जिल्ह्यात सर्वाधिक गगनबावडा तालुक्यात ११२.०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणक्षेत्रात तर पावसाचा जोर सुरूच आहे. सर्वच धरणक्षेत्रांत मिळून सरासरी ५७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. राधानगरी धरण ८८ टक्के भरल्याने शुक्रवारी सकाळी २२०० क्युसेक प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरूच आहे. तसेच घटप्रभा व कोदे ही धरणे शंभर टक्के भरल्याने येथून अनुक्रमे ४६०६ व १८९५ क्युसेक प्रतिसेकंद विसर्ग सुरू आहे. राजाराम बंधाऱ्यातून प्रतिसेकंद ५० हजार ७३० क्युसेक विसर्ग सुरू आहे. १३ नद्यांवरील ८२ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. अतिवृष्टीमुळे गगनबावडा मार्गावर किरवे येथे रस्त्यावर पाणी आल्याने गुरुवारी मध्यरात्रीपासून पाच प्रवासी बस व चार ट्रक यांमधील सुमारे २५० लोक अडकून पडले. या ठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दिनकर कांबळे यांनी भेट देऊन मदतकार्य सुरू केले. यातील काहीजणांना शुक्रवारी प्रशासनाने बोटीद्वारे सुरक्षितस्थळी पोहोचविले, तर अडकलेल्या चार बस प्रवाशांसहित फोंडा-राधानगरीमार्गे रवाना केल्या. संततधार पावसामुळे गगनबावडा तालुक्यातील टेकवाडी व शाहूवाडी तालुक्यातील बर्की या गावांचा संपर्क तुटला आहे. ३७ राज्यमार्गांसह प्रमुख जिल्हा व ग्रामीण मार्ग बंद झाले आहेत.
अनेक मार्ग बंद
जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राज्यमार्गांसह प्रमुख जिल्हा, इतर जिल्हा व ग्रामीण असे ३७ मार्ग बंद झाले आहेत. यामध्ये कोल्हापूर-गारगोटी-गडहिंग्लज-चंदगड, कोल्हापूर-चिखली-यवलूज-पुनाळ-बाजारभोगाव-करंजफेण, कोल्हापूर-गगनबावडा-तळेरे-विजयदुर्ग, पन्हाळा-वाघबीळ-बोरपाडळे-वाठार-हातकणंगले-इचलकरंजी-शिवनाकवाडी, आदी प्रमुख राज्यमार्गांचा समावेश आहे. प्रमुख जिल्हा मार्गांमध्ये कोपार्डे-पडळ-माजगाव-पोर्ले, निलजी-नूल-येणेचवंडी-नंदनवाड, शिरोली दुमाला-बाचणी-सडोली-एकोंडी-व्हन्नूर-पिंपळगाव, शेणवडे-अंदूर-धुंदवडे-राशिवडे, आकनूर-खिंडी व्हरवडे, गुडाळ, तारळे, पडसाळी-गारिवडे, बिद्री-सोनाळी-सावर्डे-गोरंबे-आणूर-बस्तवडे-हमीदवाडा-बालिंगे-पाडळी-महे-बीड-शिरोली-चांदे-धामोड, आदी प्रमुख मार्गांचा समावेश आहे. इतर जिल्हा मार्गांमध्ये शिराळे-येळवडी-सावर्डी-इंजोली-कोलिक, शाहूवाडी-कोळगाव-टेकोली-पणुंद्रे, कुडित्रे-खुपिरे-शिंदेवाडी, शिरोळ-कुरुंदवाड, यांचा समावेश आहे.
एस.टी.चे ३० मार्ग बंद
अतिवृष्टीने जिल्ह्यातील ३० मार्गांवरील एस. टी. बसची वाहतूक अंशत: तसेच पूर्णत: बंद करण्यात आली आहे. रस्त्यांवर पाणी आल्याने तसेच रस्ते खराब झाल्याने एस. टी. वाहतूकही विस्कळीत झाली आहे. कोल्हापूर-गगनबावडा, रंकाळा-बावेली, रंकाळा-कुंभवडे, रंकाळा-चौके, रंकाळा-बुरंबाळ, रंकाळा-स्वयंभूवाडी, रंकाळा-गगनबावडा, रंकाळा-अणुस्कुरा, रंकाळा-गुडाळ, रंकाळा-भोगावती, रंकाळा-तारळे, इचलकरंजी-कागल, चंदगड-भुजवडे, चंदगड-इब्रामपूर, गडहिंग्लज-ऐनापूर, गडहिंग्लज-नांगनूर, कागल-नंद्याळ, कागल-इचलकरंजी, राधानगरी-तारळे, राधानगरी-शिरगाव, गगनबावडा-धुंदवडे, आजरा-गावठाण, आजरा-देवकांडगाव, आजरा-गडहिंग्लज, आजरा-चंदगड, आजरा-दाभिल या मार्गांवरील वाहतूक अंशत: व पूर्णत: बंद झाली असून, वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे.
जिल्ह्यात ६१६.३६ मिलिमीटर पाऊस
जिल्ह्यत गेल्या २४ तासांत गुरुवारी सकाळी आठपर्यंत ६१६.३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक गगनबावडा तालुक्यात ११२.०० मि.मी., राधानगरीमध्ये ६६.६७ मि.मी., चंदगडमध्ये ८१.६६ मि.मी., आजऱ्यामध्ये ६८.२५ मि.मी., कागलमध्ये ३४.०० मि.मी., शाहूवाडीत ६७.०० मि.मी., भुदरगडमध्ये ४३.०० मि.मी., हातकणंगलेमध्ये १५.७५ मि.मी., शिरोळमध्ये ८.४२ मि.मी., पन्हाळ्यात ६०.०० मि.मी., करवीरमध्ये ३३.९० मि.मी., गडहिंग्लजमध्ये २५.७१ मि.मी. पाऊस पडला आहे.
सहा लाखांचे नुकसान
चंदगड, शाहूवाडी, कागल, राधानगरी, आजरा, भुदरगड, करवीर तालुक्यांत पावसामुळे पक्क्या व कच्च्या घरांसह जनावरांच्या गोठ्यांची पडझड होऊन सुमारे सहा लाखांचे नुकसान झाले आहे. यामध्ये २८ हून अधिक घरांचे व गोठ्यांचे नुकसान झाले आहे. बर्की (ता. शाहूवाडी) येथील दगडू गुरहान यांच्या गोठ्याचे ३० हजार रुपयांचे, बागणे (ता. कागल) येथील शंकर ताटे यांच्या घराचे ३० हजारांचे, धामणे (ता. आजरा) येथील रघुनाथ पोवार यांच्या घराचे २५ हजार रुपयांचे, काळकुंद्री (ता. चंदगड) येथील विष्णू कांबळे यांच्या घराचे ३५ हजारांचे, आडूर (ता. करवीर) येथील यशवंत जाधव यांच्या घराची पडझड होऊन ३५ हजारांचे नुकसान झाले आहे.
पुराचे पाणी जामदार क्लबपर्यंत
गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे काही प्रमाणात शहराच्या सखल भागांत पाणी साचले होते. दोन दिवसांच्या उघडिपीनंतर शुक्रवारी दिवसभर जनजीवन पूर्ववत झाले; तर धरणक्षेत्रात सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे पंचगंगा नदीला आलेल्या पुराचे पाणी शुक्रवार पेठेतील जामदार क्लबपर्यंत पोहोचले आहे. धरणक्षेत्रात पावसाचा असाच जोर राहिला तर जगद्गुरू शंकराचार्य मठाकडे जाणारा रस्ता रात्रीपर्यंत बंद होण्याची शक्यता आहे. पुराच्या पाण्यामुळे या भागातील नागरिकांनी घराच्या दुसऱ्या मजल्यावर राहण्यास प्रारंभ केला आहे.