पंचगंगातीरी रंगला प्रकाशोत्सव

By admin | Published: November 7, 2014 12:18 AM2014-11-07T00:18:51+5:302014-11-07T00:22:31+5:30

त्रिपुरारी पौर्णिमा : दिव्यांचा मंद प्रकाश, आतषबाजी, सुरेख रांगोळी अन् विद्युत रोषणाई

Panchgangitri Rangala Prakashshan | पंचगंगातीरी रंगला प्रकाशोत्सव

पंचगंगातीरी रंगला प्रकाशोत्सव

Next

कोल्हापूर : पहाटेचे प्रसन्न वातावरण, नीरव शांतता, पात्रातून संथ वाहणारे पंचगंगेचे पाणी, तर घाटावर कोल्हापूरची खासियत आणि प्रबोधनात्मकतेचा वसा देणाऱ्या आकर्षक रांगोळींची सजावट, मंदिरांवर हजारो दिव्यांचा झगमगाट, इंद्रधनुषी रंगाच्या आतषबाजीने उजळलेला आसमंत आणि विद्युतरोषणाई या प्रकाशाच्या उत्सवाने आज, गुरुवारी पंचगंगेचा काठ प्रकाशोत्सवात न्हाऊन निघाला. याशिवाय शहरात रंकाळा, राजाराम बंधारा, कात्यायनी मंदिर, अशा मंदिरांसह जलाशयांच्या ठिकाणी दीपोत्सव साजरा झाला.
जीवनातील ताणतणाव, संघर्षरूपी अंधकार दूर करून आपल्या प्रकाशाने मने उजळणाऱ्या ‘दिवाळी’ या दीपोत्सवाची खऱ्या अर्थाने आज सांगता झाली. त्रिपुरारी पौर्णिमेला जलाशयांसह मंदिरांमध्ये भल्या पहाटे अथवा दिवेलागणीच्या वेळी दिवे प्रज्वलित करून या प्रकाशोत्सवाची सांगता केली जाते. यानिमित्त पंचगंगा नदीघाट परिसरात शिवमुद्रा फें्रड्स सर्कलच्यावतीने दिवे प्रज्वलित करण्यात आले. नदीवरील सर्व घाट, ब्रह्मपुरी, महादेव मंदिर, रावणेश्वर, कुणकेश्वर मंदिर, पिकनिक पॉर्इंट, तसेच दीपमाळांवर नागरिकांनी पहाटे चारच्या सुमारास दिवे प्रज्वलित केले. आरती केल्यानंतर भव्य आतषबाजी झाली. नदीपात्रातील समाधिमंदिरांवर विविधरंगी प्रकाशझोत टाकले होते.
सिद्धेश्वर मंदिरापासून ते पंचगंगा प्रवेशद्वारापर्यंत वैविध्यपूर्ण रांगोळी रेखाटल्या होत्या. या रांगोळींवर पणत्यांची आरास केली होती. घाटावरील पायऱ्यांवरही दिवे लावले होते. या दिव्यांचे प्रतिबिंब नदीपात्रात उमटले होते.
रांगोळीतून ‘स्वच्छ भारत’चा नारा
कोल्हापूरच्या कलात्मकतेचे प्रतिबिंब या दीपोत्सवातही उमटले. रंगावलीकारांनी सुरेख रंगसंगती असलेल्या आकर्षक रांगोळी काढून या उत्सवात रंग भरले. कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलेला ‘स्वच्छ भारत’चा लोगो, महात्मा गांधीजींची प्रतिकृती, ‘अग्ली कोल्हापूर’ अशा प्रबोधनात्मक रांगोळी रेखाटल्या होत्या. याशिवाय लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या निकालांचेही पडसाद रांगोळींच्या माध्यमातून उमटले. संस्कारभारती पद्धतीच्या सुरेख रांगोळी नागरिकांचे मन आकर्षून घेत होत्या. दीपक देसाई, अभय मिठारी, पृथ्वीराज मोरे, निखिल शहापूरकर, अवधूत कोळी, उमेश निकम, प्रवीण डांगे, राम मेस्त्री यांनी संयोजन केले.
अंबाबाई मंदिरातही सायंकाळी भाविकांनी दिवे लावले. रात्री देवीची पालखी काढली. पालखी घाटी दरवाजा येथे आल्यावर आतषबाजी करण्यात आली. संस्कारभारतीच्या वतीने मिरजकर तिकटी येथील ओंकारेश्वर मंदिरात सायंकाळी मधुसूदन शिखरे यांच्या गीतांचा कार्यक्रम झाला. यावेळी सुरेख रांगोळी काढून दिवे लावण्यात आले. संजय घाटगे फौंडेशनच्यावतीनेही ताराबाई गार्डन येथील मंदिरात दिवे प्रज्वलित करण्यात आले. महावीर उद्यान परिसरात महावीर उद्यान परिसर हास्य मंचच्यावतीने पहाटे दीपोत्सव साजरा झाला. पणत्यांच्या मंद प्रकाशात अनहद ग्रुपच्या कॅराओके संगीत गायनाच्या तालावर नागरिकांनी ठेका धरला. वसंत कागले, मदन काकरे, सुरेश शहा, अरविंद जोशी यांनी संयोजन केले होते. कात्यायनी मंदिर व कसबा बावडा परिसरातही सायंकाळी दीपोत्सव साजरा झाला.

नियोजनाचा अभाव
गतवर्षीच्या तुलनेत यंदा घाटावरील दीपोत्सवात नियोजनाचा अभाव जाणवला. आरती झाल्यानंतर दिवे लावण्याआधीच आतषबाजीला सुरुवात करण्यात आली. शिवाय परिसरात एलसीडी स्क्रीन आणि मंदिरांवर प्रकाशझोत टाकण्यात आल्यामुळे पहाटेच्या अंधारात दिव्यांचा मंद प्रकाश अनुभवता आला नाही.

१) कोल्हापुरात गुरुवारी त्रिपुरारी पौणिमेनिमित्त सर्वत्र दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी करवीरनिवासिनी महालक्ष्मी मंदिरात दीप लावताना तरुणी. २) दीपोत्सवामुळे गुरुवारी रात्री पंचगंगा घाट परिसर व पायऱ्यांवर मुलींनी दिवे प्रज्वलित केले. ३) कोल्हापुरात पंचगंगा घाटावर काढलेल्या सुरेख रांगोळीत करवीरनिवासिनी अंबाबाईची मूर्ती ठेवण्यात आली होती.


उजळली नृसिंहवाडी

नृसिंहवाडी : श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात आज, गुरुवारी कार्तिकी (त्रिपुरारी) पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली. भाविकांनी यावेळी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात देवस्थानने व भाविकांनी कृष्णाकाठी लावलेल्या असंख्य दिव्याने मंदिर परिसर उजळून निघाला.
मंदिरात पहाटे पाच वाजता काकड आरती व शोडषोपचार पूजा, सकाळी आठ वाजता पंचामृत अभिषेक, दुपारी साडेबारा वाजता श्रींचे चरणकमलावर महापूजा, दुपारी तीन वाजता पवमान पंचसुक्त पठन, रात्री नऊनंतर धूप, दीप आरती व पालखी सोहळा व शेजारती असे कार्यक्रम झाले. मुख्य मंदिरासमोरील व दक्षिणोत्तर घाटावरती सायंकाळी पाचनंतर भाविकांनी दिवे लावण्यास सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत दीपोत्सव व भाविकांची वर्दळ सुरू होती.
देवस्थानच्यावतीने कापडी मंडप, दर्शनरांग, मुखदर्शन, महापूजेवेळी क्लोज सर्किट व्यवस्था, ध्वनिक्षेपक यंत्रणेची व्यवस्था केली होती. सुमारे सात ते आठ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष संजय पुजारी व सचिव सोमनाथ काळूपुजारी यांनी दिली. (वार्ताहर)

अपुरे नियोजन
गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलीस खात्यामार्फत बंदोबस्त अपुरा झाल्याने ठिकठिकाणी पाकीटमारी, तसेच मोबाईल चोरीच्या घटना घडल्या. एस.टी. आगाराच्यावतीने जादा गाड्यांचे अपुरे नियोजन झाल्याने यात्रेकरूंना बराच वेळ स्टँडवर ताटकळत थांबावे लागले. दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या वाढल्याने येथील पार्किंग व्यवस्था कोलमडली. त्यामुळे कुरुंदवाड व शिरोळ रस्त्यावर दुतर्फा वाहने लावली होती.

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात कार्तिकी (त्रिपुरारी) पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली. यावेळी हजारो भाविकांनी श्री दत्त चरणांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.

दीपोत्सव, मैफिलीने बावड्यात रंगत
कसबा बावडा : ‘ज्योत से ज्योत जलाते चलो.... प्रेम की गंगा बहाते चलो....’ यासारख्या बहारदार अन् प्रसंगानुरूप गीते सादर करून येथील राजाराम बंधारा घाटावरील दीपसंध्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाची रात्र हजारो दिव्यांच्या साक्षीने उजळून गेली.
सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शांतादेवी डी. पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून या ‘दीपोत्सव’ सोहळ्याची सुरुवात झाली. बघता बघता राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगा घाट उजळून निघाला. या कार्यक्रमात माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, प्रतिमा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पंचगंगा घाटावर भारतवीर मित्र मंडळाच्या वतीने हजारो दीप प्रज्वलित करण्यात आले. यावेळी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन तसेच जलदेवतेचे पूजन मान्यवर महिलांच्या हस्ते झाले. यावेळी राजाराम बंधाऱ्यावर आकर्षक विद्युतरोषणाई केली होती. या अविस्मरणीय सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी हजारो आबालवृद्ध पंचगंगा घाटावर आले होते. याठिकाणी पे्रक्षकांसाठी एल.ई.डी. स्क्रिनची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी महिलांसाठी ‘स्पॉट गेम’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांनी समयसूचकता दाखवीत असंख्य बक्षिसे पटकावली. यावेळी विजया पाटील. प्रिया पाटील, कल्पना पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

Web Title: Panchgangitri Rangala Prakashshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.