सीपीआरचा पंचनामा
By Admin | Published: March 10, 2016 12:45 AM2016-03-10T00:45:06+5:302016-03-10T01:07:11+5:30
‘भाजप’कडून खरडपट्टी : रामानंद यांना कारभार न सुधारल्यास कारवाईचा इशारा
कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातील गलथान आणि भ्रष्टाचारी कारभाराचा शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पंचनामा केला. पगार सीपीआरचा आणि डॉक्टरांची सेवा खासगी रुग्णालयात, रुग्णांची हेळसांड, औषधे उपलब्ध असतानाही बाहेरून आणण्यास सांगणे असे अनेक प्रकार उघड झाले. त्यास जबाबदार धरून प्रभारी अधिष्ठाता रामानंद यांची भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी खरडपट्टी करत कारभाराचे वाभाडे काढले. हा पंचनामा अचानक केल्याने प्रशासनाची भंबेरी उडाली. परिणामी बघ्यांची एकच गर्दी झाली होती.
‘सीपीआर’मधील मनमानी कारभाराने कळस गाठला आहे. रुग्णांना त्रास होत आहे. सर्वसामान्य, गरीब रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत आहे. औषधे खरेदीमध्ये ढपला मारला जात आहे. औषधे असतानाही ती बाहेरून विकत आणण्यास सांगितले जात आहे, अशा अनेक तक्रारी वाढल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर सीपीआर अभ्यागत समितीचे सदस्य व भाजपचे माजी महानगर अध्यक्ष महेश जाधव, नूतन अध्यक्ष संदीप देसाई यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी सीपीआरला दुपारी बाराच्या सुमारास भेट दिली. बाह्यरुग्ण विभागाची तपासणी केली तेथे रुग्णांशी थेट संवाद साधला. त्यावेळी रुग्णांनी औषधे बाहेरून आणण्यास सांगतात, चांगले आणि काळजीपूर्वक उपचार करत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर औषधे स्टॉक रजिस्टरची तपासणी केली. रजिस्टरला रुग्णाला आवश्यक असणारी अनेक औषधे असल्याचे दिसले. त्यानंतर जाधव यांनी औषधे शिल्लक असताना बाहेरून आणण्यास का सांगितले जाते, असा जाब रामानंद यांना विचारला.
अपघात कक्षाची तपासणी केली. कक्षाकडे रोज येणारी ४ ते ५ विष प्राशनच्या रुग्णांना देण्यासाठी आवश्यक औषधे दिली जात नाहीत, असेही निदर्शनास आले. रुग्णांसाठीच्या बेडना गंज चढला होता. प्रसुती कक्षात वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते.
आयसीयू विभागातील बेड गंजलेले होते. चाके निखळून पडली होती. स्वच्छता व अन्य कामांचा ठेका एकाला आणि कामे करतात दुसरे असे प्रकारही उघड झाले. अशाप्रकारे तब्बल तीन तास सीपीआरच्या महत्त्वाच्या विभागांची झाडाझडती घेण्यात आली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना जाधव म्हणाले, सीपीआरला वर्षाला साडेतीन कोटी रुपयांची खरेदी केली जाते तरीही रुग्णांना बाहेरून औषधे विकत आणण्यास सांगितले जाते. त्यावरून यामध्ये काहीतरी गोलमाल असल्याचा संशय आहे.
अधिष्ठाता रामानंद अकार्यक्षम आहेत. सीपीआरमध्ये गलथानपणा वाढला आहे. त्यामुळे अधिष्ठात्यांनी कारभारात सुधारणा करावी, अन्यथा शासनास कारवाई करण्यास भाग पाडू. अनेक डॉक्टरांची वैद्यकीय
बिले व अन्य लाभ अडवून ठेवले आहेत तेही त्वरित देण्याची सूचना दिली आहे. यावेळी डॉ. इंद्रजित काटकर, सुभाष रामुगडे, मारुती भागोजी आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.