सेनापती कापशी कोरोना केंद्रात अवतरली पंढरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:17 AM2021-07-21T04:17:47+5:302021-07-21T04:17:47+5:30
सेनापती कापशी : माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या सेनापती कापशी (ता. कागल) येथील कोरोना ...
सेनापती कापशी : माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या सेनापती कापशी (ता. कागल) येथील कोरोना काळजी केंद्रात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे येथील वातावरण भक्तिमय बनले. सेंटरमध्ये जणूकाही पंढरीच अवतरल्याचे दिसत होते.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सर्व कोरोना रुग्णांनी बनविलेल्या फुलांच्या माळांनी कोविड केंद्र सजवण्यात आले. विठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. कोरोना केंद्राच्या मैदानावर विठ्ठलाची भव्य प्रतिमा उभी करण्यात आली. यावेळी कापशी येथील सर्व वारकरी व भाविक मंडळी पायी दिंडी घेऊन कोरोना सेंटरवर दाखल झाले. या दिंडीचे जिल्हा परिषद सदस्या शिल्पा खोत व शशिकांत खोत यांच्या हस्ते हार घालून दिंडीचे स्वागत करण्यात आले.
याठिकाणी दिमाखदार गोल रिंगण सोहळा पार पडला. यावेळी कोरोना केंद्रातील रुग्णांनी देखील भजनाच्या तालावर फुगड्यांचा फेर धरला. या सर्व वातावरणामुळे कोरोना सेंटरवर जणूकाही पंढरीच अवतरल्याचे चित्र दिसत होते.
यावेळी शशिकांत खोत म्हणाले कोरोनामुळे सर्व सणांवर निर्बंध आले आहेत. आषाढी एकादशीसारख्या दिवशीदेखील आपल्या भावना मनात दाबून ठेवाव्या लागत आहेत. म्हणूनच आम्ही कोरोना नियमांचे पालन करीत सेंटरवर आषाढी एकादशी सोहळा साजरा करण्याचे ठरवले.
यावेळी सुनील चौगुले, शिवलिंग गुरव, संजय नाईक, साताप्पा बेलवाडकर, सुरेश काळेबेरे, विठ्ठल रुक्मिणी पायी दिंडी भक्त मंडळ, विठ्ठल रखुमाई पायी दिंडी भक्त मंडळ आदींनी सहकार्य केले.
फोटो :- आषाढी एकादशीनिमित्त सेनापती कापशी (ता. कागल) येथील कोरोना काळजी केंद्रामध्ये रंगलेला गोल रिंगण सोहळा.
फोटो: सार्थक फोटो से.कापशी