सात हजार पणत्यांनी उजळला पन्हाळा
By admin | Published: October 24, 2014 12:14 AM2014-10-24T00:14:33+5:302014-10-24T00:17:04+5:30
‘कोल्हापूर हायकर्स’तर्फे ‘एक पहाट पन्हाळगडावर’
कोल्हापूर : शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून संपूर्ण महाराष्ट्र उजळवून टाकला, त्याच महाराजांनी घडविलेले अनेक किल्ले दीपावलीच्या काळात अंधारातच असतात. हेच किल्ले उजळविण्यासाठी कोल्हापूर हायकर्सतर्फे ‘एक पहाट पन्हाळगडावर’ हा उपक्रम राबवून सुमारे सात हजार पणत्यांनी पन्हाळगड उजळविला. दीपोत्सवाची सुरुवात शिवमंदिर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन करून झाली. याप्रसंगी डॉ. अमर आडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
वर्षभर गडकिल्ल्यांवर ट्रेकिंग आयोजित करणारा ग्रुप म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूर हायकर्सने बदलत्या काळात इतिहासाचे भान सुटू नये आणि किल्ल्यांचे महत्त्व तरुणापर्यंत पोहोचावे या उद्देशाने गतवर्षीपासून हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.
कोल्हापूर हायकर्सच्या कार्याबद्दल बोलताना संभाजीराजे म्हणाले की, सागर पाटील ग्रुपच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबवीत असतात. राज्याभिषेकासाठी रायगडी पाच किल्ल्यांवरून पाणी आणून कोल्हापूर हायकर्सने या ऐतिहासिक उत्सवात आपले योगदान दिले आहे. हा दीपोत्सवदेखील तसाच आहे.
डॉ. अमर आडके यांनी या शिवमंदिराचा इतिहास उपस्थितांसमोर वर्णन केला. या दीपोत्सवासाठी खास कोल्हापुराहून सायकलवरून आलेले अनिल भोसले यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. श्रीकांत पाटील व पन्हाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पां. ग. मसलेकर यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याजवळ माजी नगराध्यक्ष चंद्रकांत गवंडी यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपोत्सवास प्रारंभ झाला. याठिकाणी सूरज ढोली यांच्या शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंचच्या पथकाने मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. या दीपोत्सवाने संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. हे पाहण्यासाठी पर्यटकांसह नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
दीपप्रज्वलनाने शिवमंदिर परिसर असा उजळला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी उभ्या केलेल्या गडांना मोठा इतिहास आहे. हा इतिहास जपण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. यासाठी मी व माझ्या ग्रुपने गेल्या वर्षापासून दिवाळीच्या पहाटे हा उपक्रम राबवीत आहे. यातून आम्हाला एक वेगळी ऊर्जा, प्रेरणा मिळते.
- सागर पाटील, अध्यक्ष, कोल्हापूर हायकर्स