पन्हाळा-बुधवारपेठ रस्ता भूस्खलनाने खचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:16 AM2021-07-24T04:16:28+5:302021-07-24T04:16:28+5:30
पन्हाळा : पन्हाळा - बुधवारपेठ रस्ता भूस्खलनाने खचल्यामुळे पन्हाळ्यावर येण्याचा प्रमुख मार्गच बंद झाला आहे. ...
पन्हाळा : पन्हाळा - बुधवारपेठ रस्ता भूस्खलनाने खचल्यामुळे पन्हाळ्यावर येण्याचा प्रमुख मार्गच बंद झाला आहे. गेल्या चोवीस तासात २९५ मि.मी. इतका जोरदार पाऊस झाल्याने रस्त्याच्या उताराच्या बाजूने मोठा प्रवाह वाहत होता. त्यामुळे सकाळी साडेसहाच्या दरम्यान हा रस्ता खचला. चार दरवाजा येथील जुना नाका ते १८८८ साली बांधलेल्या संरक्षक कठड्यापर्यंतचा रस्ता उताराच्या बाजूने खाली ६० फूट मंगळवार पेठेत खचला. भूस्खलनामुळे विजेच्या खांबासह व सार्वजनिक बांधकाम खात्याने बांधलेल्या कठड्यासह अर्धा रस्ता खचल्याने गडावर येण्याचा प्रमुख मार्ग बंद झाला आहे. सलग दुसऱ्यावेळी हा रस्ता बंद झाला आहे. २०१९ साली रेडे घाट आणि मार्तंड परिसरात पाण्याच्या प्रवाहामुळे माती घसरून पन्हाळ्यावर येणारा रस्ता खचला होता. याच्या दुरुस्तीसाठी नऊ महिन्यांचा कालावधी गेला होता. यावर्षी गडावरील सांडपाणी व पावसाच्या पाण्यामुळे खिळखिळा झालेल्या या परिसराचे भूस्खलन झाले. यामुळे पायथ्याला असणाऱ्या मंगळवार पेठेतील घरांचे नुकसान झाले आहे. अजूनही याठिकाणी सादोबा तलावाचा धोका निर्माण झाला असून तलावात सध्या बाहेरील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने तलावाची पूर्व बाजू कमकुवत झाली आहे.
दरम्यान, पन्हाळ्यावर येण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून तीन दरवाजातील मार्गाचा वापर होत होता, पण तोही रस्ता दोन दिवसांपासून खचू लागल्याने गडावर येण्याचा मार्गच सध्या बंद झाला आहे .
फोटो २३ पन्हाळा रोड खचला
जुना नाका ते संरक्षक कठडापर्यंत भूस्खलनाने घसरलेला पन्हाळ्यावर येणारा रस्ता.