पन्हाळ्यात जनसुराज्यचाच गुलाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:25 AM2021-01-19T04:25:43+5:302021-01-19T04:25:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पन्हाळा : तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींची मतमोजणी सोमवारी पूर्ण झाली. सर्वात मोठ्या कोडोली येथील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पन्हाळा : तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींची मतमोजणी सोमवारी पूर्ण झाली. सर्वात मोठ्या कोडोली येथील ग्रामपंचायतीची सत्ता आमदार विनय कोरे यांनी अबाधित राखली, तर कळे येथे शिवसेनेने निसटता विजय मिळविला. मोठ्या लोकसंख्येच्या पोर्ले ग्रामपंचायतीत सतांतर झाले. जनसुराज्य पक्षाने २५ ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व राहिल्याचा दावा केला आहे.
पन्हाळा तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींपैकी सोमवारपेठ, आंबर्डे, उत्रे या तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठीची मतमोजणी नगरपरिषद सांस्कृतिक सभागृहात झाली. दोन ठिकाणी समान मते पडल्याने चिठ्ठीवर दोन सदस्य विजयी झाले, तर पूर्व भागातील २५ ग्रामपंचायतींवर जनसुराज्यने आपले वर्चस्व राखले. बहुतेक ग्रामपंचायतींमध्ये सतांतर झाले आहे, तर पश्चिम भागात केवळ ५ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने आपले प्राबल्य ठेवले आहे. उर्वरित १० ग्रामपंचायतींमध्ये जनसुराज्य - काँग्रेस - शिवसेना अशा आघाडीचे सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे पश्चिम भागातील १५ ग्रामपंचायतींमधील शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा हा भाग आता राहिला नसल्याचे स्पष्ट झाले.
.............
जनसुराज्यच्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे...
आपटी, नेबापुर, नावली, जेऊर, इंजोळे, बुधवारपेठ, आवळी, धबधबेवाडी, जाफळे, पोखले, मोहरे, आरळे, सातवे, पुनाळ, वाघवे, पोर्ले तर्फ ठाणे, सावर्डे तर्फ सातवे, केखले, निकमवाडी, कणेरी, दिगवडे, कोडोली, सोमवार पेठ, आंबर्डे, उत्रे.
.............
शिवसेना ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे...
कळे, तिरपण, नणुंद्रे, माजनाळ, म्हाळुंगे तर्फ बोरगाव
जनसुराज्य-काँग्रेस-शिवसेना - हरपवडे, उंड्री, पुशीरे तर्फ बोरगाव, तेलवे, पैजारवाडी, सातार्डे, देवाळे, निवडे, पोंबरे, पोहाळे तर्फ बोरगाव, वारनुळ, पोहाळवाडी.
............
दोन ठिकाणी चिठ्ठीवर पैसला
विशांत महापुरे यांच्या पत्नी पराभूत झाल्या, तर आरळे येथे सविता महापुरे व कादंबरी मोरे या महिला उमेदवारांना ३४९ अशी समान मते पडली. या ठिकाणी चिठ्ठीवर सविता महापुरे विजयी झाल्या, तर पुशिरे तर्फ बोरगावमध्ये सुध्दा अनिता पाटील व माधुरी दबडे यांना २०६ समान मते मिळाली. या ठिकाणी चिठ्ठीवर अनिता पाटील विजयी झाल्या. कळे ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांची गेल्या दहा वर्षांपासून एकहाती सत्ता आहे. यावेळी १५ पैकी केवळ ८ जागांवर त्यांना निसटता विजय मिळवता आला.