पन्हाळा पालिकेत जनसुराज्यमध्ये फूट
By admin | Published: October 28, 2015 11:00 PM2015-10-28T23:00:40+5:302015-10-29T00:16:49+5:30
नगराध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी : शहर विकासाचे सर्व विषय नामंजूर, बहिष्काराचा इशारा
पन्हाळा : नगरपालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत पन्हाळा शहर विकासाचे सर्व विषय नामंजूर करून नगराध्यक्ष असिफ मोकाशी यांनी राजीनामा दिल्याखेरीज पुढील सर्व सभांना आपण हजर राहणार नसल्याचे पक्ष प्रतोद नगरसेवक विजय पाटील यांनी सांगितले.
नगरपरिषदेचे सर्वच नगरसेवक जनसुराज्य शक्ती पक्षातून विजयी झालेले आहेत, म्हणजे सर्वजण या पक्षाचेच काम करतात. चालू पंचवार्षिकमध्ये सुरुवातीची अडीच वर्षे मागासवर्गीय नगराध्यक्ष म्हणून चंद्रकांत गवंडी यांनी काम केले. यानंतर हे पद खुले झाले. यावेळी असीफ मोकाशी व विजय पाटील यांच्यामध्ये चुरस होती. यावेळी असीफ मोकाशी यांनी ११ नगरसेवक घेऊन सवतासुभा मांडला; पण पक्षाच्या नेत्यांनी विजय पाटील यांच्यासाठी प्रयत्न केले. असीफ मोकाशी यांनी हट्ट धरल्याने हे पद सव्वावर्षाचे असे ठरविले गेले, पण हे एकतर्फी ठरले गेले. या निवडीवेळी वारणा समूहाने प्रचंड गोंधळ केला. या गोंधळामुळेच असिफ मोकाशींनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावयाचा नाही, असा निर्णय घेतला होता. तोच निर्णय कायम ठेवत सध्याचे धोरण त्यांचे आहे. त्यांच्याकडे सात नगगरसेवक असले, तरी त्यांच्यावर अविश्वास ठराव आणावयाचा झाल्यास १३ नगरसेवक लागतात. त्यामुळे त्यानंतर जरी अविश्वास ठराव दाखल केला, तरी तो पास होणार नाही. त्याचबरोबर पन्हाळा नगरपरिषदेची निवडणूकही आॅक्टोबर २०१६ ला होत असल्याने पन्हाळा शहराचा विकास थांबला, तर त्याची किंमत जनसुराज्य शक्ती पक्षाला मोजावी लागणार असल्याने पुढे काय होणार याची उत्सुकता लागलेली आहे.
सभेत सर्व विषय नामंजूर करणार असल्याचे अकरा नगरसेवकांनी लेखी पत्र नगराध्यक्षांना दिले व राजीनामा देण्याची मागणी केली. यामुळे सभा तहकूब करण्याचा निर्णय झाला. तथापि, महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे तोंडी नगरसेवकांनी सांगितल्यावर सभा पुन्हा सुरू झाली. आकस्मिक पाणीपुरवठा व जलनिस्सारण मंडळाने १ नोव्हेंबरपासून पाणीपुरवठा बंद करणार याबाबातचे ठराव झाले व बाकी सर्व विषय नामंजूर करून सभा संपली.
पक्षप्रतोद विजय पाटील यांनी सांगितले की, असिफ मोकाशी यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा आमच्याकडचे अकरा नगरसेवक सर्व सभांना असहकार करणार आहेत.
नगराध्यक्ष पदाचा हा वाद जरी चिघळला असला, तरी असिफ मोकाशी राजीनामा निश्चित देतील, असा विश्वास पक्षाचे प्रमुख विनय कोरे यांनी व्यक्त केला. त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याची गरज भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)