पन्हाळा नगरपालिका : पाणीपट्टीत कपात कधी होणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 11:00 PM2018-11-07T23:00:32+5:302018-11-07T23:08:34+5:30
पन्हाळा शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत कासारी नदीवरून जो पाणीपुरवठा केला जातो. त्याची दोन महिन्याला ३५0 रुपये आकारणी होत होती. मात्र, गेल्या आॅगस्ट महिन्यापासून ही पाणीपट्टी आकारणी १0५0 रुपये करण्यात आली आहे
पन्हाळा : पन्हाळा शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत कासारी नदीवरून जो पाणीपुरवठा केला जातो. त्याची दोन महिन्याला ३५0 रुपये आकारणी होत होती. मात्र, गेल्या आॅगस्ट महिन्यापासून ही पाणीपट्टी आकारणी १0५0 रुपये करण्यात आली आहे. ही पाणीपट्टी रद्द होण्याची घोषणा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली होती. मात्र, दोन महिने झाले तरी ही वाढीव पाणीपट्टी रद्द झाली नसल्याने मंत्री सदाभाऊ खोत यांची घोषणा हवेतच आहे. ही वाढीव पाणीपट्टी कधी कमी होणार? अशा संतप्त प्रक्रिया पन्हाळावासियांच्यातून उपस्थित होत आहेत.
१९८५ मध्ये जीवन प्राधिकरणाने कासारी नदीवरून तीन टप्प्यांत पाणी वर उचलून पन्हाळकरांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून ही सेवा सरू केली. सुरुवातीला रोज एक तास पाणी दिले जात असे, हळूहळू या पाणीपुरवठा विभागाकडे शासनाचे दुर्लक्ष होत गेल्याने व योजनेकडे कमी ग्राहक असल्याने ही पाणी योजना तोट्यात गेल्याने नगरपरिषदेकडे वर्ग करावी, असा शासनाचा आग्रह राहिला.
तथापि, पन्हाळा नगरपरिषद ही कमी लोकसंख्येची व उत्त्पन कमी असल्याने ही योजना शासनानेच चालवावी, असा निर्णय झाला. गेल्या दहा वर्षांपासून जीवन प्राधिकरण पन्हाळा शहराला एक दिवस आड पाणीपुरवठा करीत आहे. ही जुनी योजना मोडकळीस आली असून वारंवार बिघाड होत आहे. सध्या जीवन प्राधिकरणाला ही जुनी योजना चालविणे कठीण बनले असून नगरपरिषदने चालवावी म्हणून जीवनप्राधिकरण आग्रही आहे. परिणामी, जीवनप्राधिकरण पाणीपट्टीत वाढ करून ग्राहकांना त्रास देत असल्याचे जाणवते.
ही दरवाढ तातडीने रद्द करावी, अशी जोरदार मागणी पन्हाळावासियांच्यावतीने होत आहे. महिन्याभरात ही दरवाढ रद्द व्हावी, यासाठी सामान्य जनतेला सोबत घेऊन तीव्र लढा उभारण्याचा इशारा राष्ट्रावादीचे शहराध्यक्ष सखाराम काशीद, शिवसेना शहरप्रमुख मारुती माने, विशाल दुबुले, इरफान मुजावर, आदींनी दिला आहे.
थकबाकी भरण्याची नामुष्की येणार
1 या वाढीव पाणीपट्टीबाबत या विभागाचे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची नगराध्यक्षा रूपाली धडेल यांनी भेट घेऊन ही वाढीव पाणीपट्टी रद्द करण्याची मागणी केली होती. यावेळी ही अन्यायी पाणीपट्टी रद्द करण्याची घोषणा मंत्री खोत यांनी दिली होती.
2 मात्र, वाढीव पाणीपट्टी रद्द होईपर्यंत जुन्या दराने बिले बँकेत न भरता नगरपरिषदेत भरावी, असे नगरपरिषदेकडून सांगण्यात आले आहे. मात्र, याबाबत कोणतेही लेखी पत्र जीवनप्राधिकरणाकडे तसेच नगरपरिषदेकडे नसल्याने ग्राहकांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
3 काही ग्राहकांनी जुन्या दराने पाणी बिले भरली आहेत; पण जीवनप्राधिकरणाच्या नव्या पाणीपट्टीनुसार उर्वरित ७00 ची रक्कम ही थकबाकी दाखवून या महिन्याचे बिल देखील नव्या दराने आले नाही. त्यामुळे जर का ही वाढीव पाणीपट्टी रद्द झाली नाही, तर मात्र नव्या दराने थकबाकी भरण्याची ग्राहकांवर नामुष्की येणार असल्याची भीती काही नागरिकांनी व्यक्त केली आहे.