पन्हाळा-पावनखिंड मोहीम आता माहितीपूर्ण
By admin | Published: June 16, 2017 12:47 AM2017-06-16T00:47:46+5:302017-06-16T00:47:46+5:30
जिल्हा नियोजन मंडळ : सात लाखांचा निधी; १६० फलक, मैलाचे दगड उभारण्याचे काम सुरू
समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क---कोल्हापूर : महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह अनेक राज्यांतील युवा पिढीला ‘मान्सून ट्रेकिंग’चे वेड लावणारी पन्हाळा-पावनखिंड मोहीम आता आणखी माहितीपूर्ण आणि दिशादर्शक होणार आहे. पन्हाळ्याच्या राजदिंडीपासून ते पाताळदरा इथंपर्यंत या परिसरातील ऐतिहासिक माहिती मोजक्या शब्दांत देणारे आणि दिशा दर्शविणारे १६० फलक लावण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून सात लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
गेली ४० वर्षे ही मोहीम राबविली जाते. अशातच गेल्या दहा वर्षांमध्ये पन्हाळा-पावनखिंड मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. मैत्रेय, सह्याद्री प्रतिष्ठान, हिलरायडर्स, शिवराष्ट्र, निसर्गवेध, पोवार तालीम यांच्यावतीने दरवर्षी या मोहिमेचे आयोजन करण्यात येते. प्रामुख्याने जुलै, आॅगस्टमध्ये होणाऱ्या या मोहिमांमध्ये आता महाराष्ट्रासह अन्य राज्यांतूनही तरुण-तरुणी सहभागी होत आहेत. वरून कोसळणारा धो-धो पाऊस आणि पायाखालची निसरडी वाट यातून ही मोहीम पूर्ण करताना येणारा चित्तथरारक अनुभव अविस्मरणीय ठरतो.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे अतुलनीय धाडस बाजीप्रभू, फुलाजी प्रभू देशपांडे आणि वीर शिवा काशीद यांच्या बलिदानाची कथा ऐकताना मोहिमेमधील उपस्थितांच्या अंगावर काटा उभा राहतो. या मार्गाची लोकप्रियता वाढत असताना हा मार्ग अधिकृत ठरावा, कुणीही यावं आणि कुठूनही जावं असं न होता त्याला एक शिस्त यावी यासाठी ही फलक संकल्पना राबविण्यात येत आहे.
पन्हाळ्यावरील राजदिंडीपासून हे फलक लावण्यास सुरुवात होईल. या ठिकाणी मोठा (पान ४ वर)
इतिहास डोळ्यांसमोर उभा राहिला पाहिजे
या मार्गांने जाणाऱ्यांच्या डोळ्यांसमोर इतिहास उभा राहिला पाहिजे ही या योजनेमागची भूमिका आहे. सन १९८७ पासून माझी ही कल्पना होती; परंतु ती आता प्रत्यक्षात येत आहे. आपल्या रयतेसाठी जिवावर उदार होणारा राजा आणि त्या राजासाठी बलिदान देणारे निष्ठावंत मावळे यांची स्मृती जागविणारी ही मोहीम आहे. ती माहितीपूर्ण व्हावी यासाठी ही योजना पूरक काम करेल.
- डॉ. अमर आडके, इतिहास अभ्यासक
‘जीआरसी’मध्ये काम
हे दिशादर्शक फलक उभारण्यासाठी काचपूडमिश्रित काँक्र ीट वापरण्यात आले आहे. त्यामुळे किमान १०० वर्षे हे फलक, दगड टिकतील, असे सांगितले जाते. जाणीवपूर्वक या वेगळ्या मटेरियलमध्ये हे काम करण्यात येत आहे.
पूर्ण नंदी हवा
स्वराज्यावरील आक्रमणावेळी पन्हाळ्याच्या पायथ्याला असलेला नंदी फुटला आणि ठिकाणाला ‘फुटका नंदी’ असे संबोधले जाऊ लागले; परंतु या ठिकाणी आता चांगला, पूर्णाकृती नंदी उभारून ‘फुटका नंदी’ ही ओळख पुसणे आवश्यक आहे.