Trekking Kolhapur : पन्हाळा- पावनखिंड यात्रा दुसऱ्या वर्षीही स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 07:24 PM2021-06-12T19:24:17+5:302021-06-12T19:26:12+5:30
Trekking Kolhapur : जुलै महिन्यात प्रत्येक वर्षी निघणारी पन्हाळा - पावनखिंड शौर्य यात्रा सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे स्थगित करून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला. शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात कोल्हापूर डिस्ट्रिक्ट माऊन्टेनिअरिंग असोसिएशनतर्फे आयोजित बैठकीत हा निर्णय झाला. दूर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके अध्यक्षस्थानी होते.
कोल्हापूर : जुलै महिन्यात प्रत्येक वर्षी निघणारी पन्हाळा - पावनखिंड शौर्य यात्रा सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे स्थगित करून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला. शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात कोल्हापूर डिस्ट्रिक्ट माऊन्टेनिअरिंग असोसिएशनतर्फे आयोजित बैठकीत हा निर्णय झाला. दूर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके अध्यक्षस्थानी होते.
डॉ. अडके म्हणाले, प्रत्येक वर्षी जुलै महिन्यात पन्हाळा ते पावनखिंड अशी शौर्य पदयात्रा ११ आणि १२ जुलैला निघते. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील मोठ्या संख्येने दूर्गप्रेमी सहभागी होतात. शाहूवाडी तालुक्यातील १६ वाड्यांतून ही यात्रा निघते. दरम्यान, यंदाही कोरोनाचा संसर्ग वाढलेलाच आहे. अशा परिस्थितीमध्ये वाटेतील १६ वाड्यांतील ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी यंदाही शौर्य यात्रा स्थगित करण्यात आली आहे. सलग दुसऱ्या वर्षी यात्रा स्थगित करण्यात आली आहे.
यात्रेऐवजी रक्तदान शिबिराचे आयोजन करावे. मोजक्याच लोकांनी जाऊन पन्हाळ गडावर शिवा काशिदांना वंदन करण्याचा कार्यक्रम करण्यासाठी प्रशासनाची परवानगी मिळते, का याची माहिती घेतली जाईल. त्यानंतर यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल. दरम्यान, पुढील वर्षी कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर नियोजनबध्दपणे शौर्य यात्रेचे नियोजन केले जाईल. नियोजनासाठी मध्यवर्ती समिती पुढाकार घेईल.
शाहूवाडीचे सदाशिव पाटील यांनी विविध सूचना मांडल्या. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट माऊन्टेनिअरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष हेमंत साळोखे यांनी स्वागत केले. सागर पाटील, पंडीत पोवार यांनी विविध सूचना मांडल्या. विनोद साळोखे, साताप्पा कडव आदी उपस्थित होते. विनोद साळोखे यांनी सूत्रसंचालन केले.
रणसंग्राम पोहचवणार
पन्हाळा - पावनखिंड शौर्य यात्रा स्थगित करण्यात आली असली तरी ११ आणि १२ जुलैला पावनखिंडीचा रणसंग्राम सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्यात येईल, असे डॉ. अडके यांनी सांगितले.