Kolhapur: 'जय भवानी..जय शिवाजी'च्या जयघोषात हिलरायडर्सच्या पन्हाळा-पावनखिंड मोहिमेस सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 15:38 IST2023-07-01T15:34:57+5:302023-07-01T15:38:50+5:30
मोहिमेत सहभागी होणाऱ्या साहसीवीरांनी मोठी गर्दी केली होती

Kolhapur: 'जय भवानी..जय शिवाजी'च्या जयघोषात हिलरायडर्सच्या पन्हाळा-पावनखिंड मोहिमेस सुरुवात
नितीन भगवान
पन्हाळा: दाट धुके, थंडगार वारा व अंगावर पडणाऱ्या पावसाच्या सरी अशा वातावरणात 'जय भवानी...जय शिवाजी, शिवाजी महाराज की जय, हर..हर..महादेव, नरवीर शिवाकाशीद, बाजीप्रभु देशपांडे की जयघोषणांनी संपुर्ण पन्हाळगड दणादणून गेला. अन् हिलरायडर्स अँडव्हेंचर फौंडेशनच्या ६५ व्या पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंतीचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
या मोहिमेचा शुभारंभ शिवसेना कार्यप्रमुख विजय देवणे, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी संजय मोरे, युवा नेतृत्व कृष्णराज महाडिक, उदय गायकवाड यांच्या हस्ते वीर बाजीप्रभु देशपांडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष असिफ मोकाशी, हिलरायडर्सचे अध्यक्ष प्रमोद पाटील, सागर बगाडे, आदी मान्यवर उपस्थित होते. मोहिमेत सहभागी होणाऱ्या साहसीवीरांनी मोठी गर्दी केली होती.
याअगोदर सकाळी पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापुर येथील नरवीर शिवा काशीद समाधीस प्रमोद पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन हिलरायडर्स अँडव्हेंचर फौंडेशनच्या वतीने अभिवादन करण्यात आले. शनिवारी सकाळी नऊ वाजता मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. मोहीमेची माहिती फौंडेशनचे सागर बगाडे यांनी दिली. त्यानंतर सर्व मोहिमेतील साहसीवीरांनी ध्येय मंत्राचे पठण केले. सध्या मोहिमेत दोनशे जणांचा सहभाग असल्याचे प्रमोद पाटील यांनी सांगितले.