पन्हाळ्यात शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारात
By admin | Published: June 4, 2015 11:30 PM2015-06-04T23:30:49+5:302015-06-05T00:20:26+5:30
शाळांच्या संख्येत वाढ : पटपडताळणीमुळे शिक्षक अडकले कात्रीत
किरण मस्कर - कोतोली -ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शाळांचे निकाल मिळाल्यानंतर माध्यमिक शाळांच्या शिक्षकांनी आता आपल्या शाळांना विद्यार्थी मिळावेत, यासाठी विद्यार्थी शोधमोहीम सुरू केली आहे.
विनाअनुदानित शाळांची संख्या ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे गावागावांत शाळांचे पेव फुटले आहे. यामुळे शिक्षकांवर पालकांचे उंबरठे झिजवून विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे. आपल्या शाळेत विद्यार्थी आल्यानंतर त्यांना विविध सुविधा देणार आहे, अशी आमिषे शिक्षक पालकांना दाखवीत आहेत, तर जी शाळा पाल्याला जास्त सेवा-सुविधा देईल, अशा शाळेत मुलांना पाठविण्याची पालकांची मानसिकता आहे.
गत वर्षात अनेक विनाअनुदानित शाळांना परवानग्या देण्यात आल्या. राजकारणातून एका-एका गावात दोन-दोन शाळा स्थापन करण्यात आल्या आणि प्रश्न निर्माण झाला विद्यार्थ्यांचा. याचा परिणाम म्हणून संस्थाचालकांनी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत फिरविण्यास सुरुवात केली. यामुळे आपली नोकरी टिकून राहावी, यासाठी शिक्षकांनीसुद्धा विद्यार्थ्यांचे उंबरठे झिजविण्यास सुरुवात केली. सरकारने सुरू केलेल्या पटपडताळणीमुळे तर शिक्षकवर्ग मोठ्या कात्रीत सापडला आहे. विद्यार्थीसंख्येवर घालण्यात आलेली बंधने, अतिरिक्त तुकड्यांचा प्रश्न, पटपडताळणी करून तुकड्या कमी कशा होतील यासाठी शिक्षण विभागाने चालविलेली धडपड, यामुळे तुकड्या कमीची टांगती तलवार असून, शिक्षकाची नोकरी म्हणजे तारेवरची कसरत बनली आहे. याचा परिणाम शिक्षकांना मिळालेली उन्हाळ्याची सुटी या शिक्षकांनी आता विद्यार्थी मिळविण्यासाठी खर्ची घालण्यास सुरुवात केली आहे. याचा परिणाम शाळा-शाळांमध्ये चुरस निर्माण झालेली पाहावयास मिळत आहे. एकदा विद्यार्थीसंख्या पूर्ण झाली की, पुढील तीन वर्षे तुकडीला कोणतीच अडचण येणार नाही. यासाठी शिक्षक साम, दाम, त्याचबरोबर राजकीय दबावतंत्र वापरत असल्याचे गावागावांत पाहावयास मिळत आहे. यासाठी विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश, पुस्तके, वह्या, एस. टी. पास, फीमध्ये सवलत, छत्र्या, रेनकोट, आदींची आमिषे दाखविली जात आहेत.
काही ठिकाणी पालकांना जेवणावळी लावून पाल्यांना आपल्या शाळेत पाठविण्याचा नवा फंडा ग्रामीण भागात तयार झाला आहे. काही पालकांनी या प्रकाराला नापसंती दाखविली आहे. तसेच शाळेची पात्रता तपासूनच आम्ही आमच्या पाल्यांना कोणत्या शाळेत पाठवायचे ते ठरविणार आहे.
- शिवाजी आनंदा जाधव,
पालक (कोलोली).