आल्हाददायक वातावरणात ‘पन्हाळगड-पावनखिंड ’ पदभ्रमंती मोहीमेस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 01:34 PM2018-07-07T13:34:16+5:302018-07-07T13:43:50+5:30
‘छत्रपती शिवाजी महाराज की जय ’ , ‘हर हर महादेव ’ अशा जयघोषात व अभूतपूर्व उत्साहात ५१ व्या ‘पन्हाळगड ते पावनखिंड’ मोहीमेस शनिवारी सकाळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सुरुवात झाली. प्रथम नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यात महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, दिल्ली आदी ठिकाणाहून अकराशेहून अधिक शिवभक्त मावळे सहभागी झाले होते.
कोल्हापूर : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय ’ , ‘हर हर महादेव ’ अशा जयघोषात व अभूतपूर्व उत्साहात ५१ व्या ‘पन्हाळगड ते पावनखिंड’ मोहीमेस शनिवारी सकाळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सुरुवात झाली. प्रथम नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यात महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, दिल्ली आदी ठिकाणाहून अकराशेहून अधिक शिवभक्त मावळे सहभागी झाले होते.
शिवरायांचे मावळे, शिलेदार आपल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी चालत, घोड्यावरुन सह्याद्रीच्या कुशीतून, अवघड वाट पार करीत शत्रुंशी झुंजले. त्याच सह्याद्रीच्या भूमीवर इतिहासाच्या पाऊलखुणा जपत, जुलैच्या ऐन पावसाळ्यात वादळी वारा, तुफानी पाऊस, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट अंगावर झेल ज्या वाटेने शिवराय पन्हाळगडावरुन विशाळगडाला गेले. जेथे घोडखिंडीत बाजीप्रभुंचे रक्त सांडले, अनेक मावळेही यात धारातिर्थी पडले.
वीर शिवा काशिद यांच्यासह ज्ञात-अज्ञात शुरवीरांच्या स्मृती जागविण्यासाठी‘हिल रायडर्स अॅडव्हेंचर फौडेशन ’ ने त्यांच्या ३५८ व्या पुण्यतिथीनिमित्त यंदा तीन मोहीमांचे आयोजन केले आहे. त्यातील पहिली ५१ वी मोहीम शनिवारपासून सुरु झाली. दोन दिवसीय मोहीमेत राज्यासह परराज्यातील अकराशेहून अधिक पर्यटक गिर्यारोहक सहभागी झाले आहेत.
सुरुवातीला सुरज ढोली यांनी शिववंदना सादर केली. पहिल्या दिवशी बाजी प्रभु देशपांडे यांच्या पुतळ्यापासून सुरु झालेली ही मोहीम राजदिंडी मार्गे मसाई पठार-खोतवाडी-मांडलाईवाडी-करपेवाडी-आंबर्डे तर्फ आंबवडे येथे उशिरा रात्री मुक्कामास पोहचली. आज, रविवारी रिंगेवाडी-कळकेवाडी-मळेवाडी-पाटेवाडी-सुकाम्याचा धनगरवाडा-म्हसवडे वाडा-पांढरे पाणी ते पावनखिंड येथे ती समाप्त होणार आहे.
यावेळी नगराध्यक्षा रुपाली धडेल, शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे, नगरसेविका तेजस्विनी गुरव, पप्पु धडेल, दिनकर भोपळे, माजी नगराध्यक्ष असिफ मोकाशी, नगरसेवक चेतन भोसले, पी.आर.भोसले, चंदन मिरजकर, सन्मती मिरजे, विनोद कांबोज, युवराज साळोखे, अजितसिंह काटकर, आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी केले.
शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत ही साहसी मोहीम प्रत्येकाला नवी उर्जा देणारी ठरेल . यातील प्रत्येक सहभागींनी त्याकाळचा प्रवास पायी चालून अनुभवावा. प्रत्येकाने शिवाजी महाराजांचे चरित्र जरुर वाचावे. त्यातून प्रत्येकाला प्रेरणा मिळेल. असे मत मोहीमेच्या उदघाटनप्रसंगी पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केले.
पन्हाळ नगरपरिषद, विद्यामंदीर पन्हाळा, वन खाते, पोलीस यांच्यावतीने खास या मोहीमेकरीता वृक्ष दिंडी काढण्यात आली. अग्रभागी पारंपारिक वेशातील मुलींनी लेझीम, मर्दानी खेळाची प्रात्याक्षिके सादर केली. तर मोहीमेत सहभागी मावळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हिलरायडर्सचे १२५ हून अधिक स्वयंसेवक कार्यरत होते.
गेली ३३ वर्षे सातत्याने पन्हाळा-पावनखिंड ही पदभ्रमंती मोहीम सातत्याने सुरु आहे. यातील सहभागी होणाऱ्यांची संख्याही विक्रमी आहे. गेल्या वर्षी या मोहीमेची नोंद ‘इंडिया बुक’ मध्ये झाली. यंदा गिनीज बुकात नोंद होण्यासाठी ‘हिल रायडर्स’ तर्फे प्रयत्न सुुरु आहेत. याकरीता डिसेंबर २०१८ मध्ये विशेष मोहीम आयोजित केली जाणार आहे. अशी माहीती संस्थेचे विनोद कांबोज यांनी दिली.