शिवरायांच्या जयघोषात पन्हाळगड प्रदक्षिणा
By admin | Published: February 29, 2016 12:49 AM2016-02-29T00:49:56+5:302016-02-29T00:51:41+5:30
गडसंवर्धनासाठी पन्हाळगड प्रदक्षिणा मोहीम उत्साहात झाली. सुमारे तीन हजार युवक-युवती या मोहिमेत सहभागी
पन्हाळा : छत्रपती शिवरायांसह त्यांच्या मावळ््यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हिल रायडर्स अँड हायकर्स ग्रुपने आयोजित केलेली गडसंवर्धनासाठी पन्हाळगड प्रदक्षिणा मोहीम उत्साहात झाली. सुमारे तीन हजार युवक-युवती या मोहिमेत सहभागी झाले होते.
‘जय भवानी जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’.. या घोषणांनी पन्हाळगड दुमदुमून गेला होता. वीर शिवा काशीद यांच्या समाधीस व पुतळ््यास वंदन करून मोहिमेस सुरुवात झाली. यावेळी पन्हाळा तहसीलदार रामचंद्र चोबे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील, नगराध्यक्ष असीफ मोकाशी, ‘संजीवन’चे संस्थापक पी. आर. भोसले, एन. आर. भोसले, नगरसेवक विजय पाटील, डॉ. बी. आर. कोरे, राजू आगा, आदी मान्यवरांनी गड प्रदक्षिणेची सुरुवात चार दरवाजा येथून केली. ही प्रदक्षिणा चार दरवाजा, रेडेघाट, नरसुखिंड, तीन दरवाजा, गोपाळतीर्थ बाग, पुसाटी बुरूज, फुटकानंदी, तबक उद्यान, सज्जाकोटी, थोरात समाधी, नेबापूर, शिवा काशीद समाधी व परत चार दरवाजा अशी संपूर्ण गडच्या खालून प्रदक्षिणा पार पडली. प्रदक्षिणेस सुमारे पाच ते सहा तास वेळ लागला.
गड प्रदक्षिणेसाठी संजीवन नॉलेज सिटीचे एक हजार विद्यार्थी, पन्हाळा विद्यामंदिरचे पाचशे विद्यार्थी, हिल रायडर्स ग्रुपचे एक हजार कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, इतिहासप्रेमी सहभागी झाले होते.
आजच्या तरुणाईला गडकिल्ल्यांचा शौर्यशाली इतिहास कळावा, गडकोटाबद्दल प्रेम निर्माण व्हावे, त्यांच्या अंगी साहस, चिकाटी, जिद्द निर्माण व्हावी यासाठी संजीवन पब्लिक स्कूलचा विद्यार्थी सत्यजित काळभोर व हायकर्स ग्रुपच्या
वतीने सागर बगाडे यांनी माहिती दिली. मोहिमेत सर्वांत लहान चार
वर्षे वयाची वसुप्रिया आदित्य वेल्हाळ व ईश्वरी रामचंद्र चोबे यांनी भाग घेतला, तर ज्येष्ठ नागरिक विजय भोसले व डॉ. परांडेकर यांनी सहभाग घेतला.
या मोहिमेत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. गड प्रदक्षिणा मोहिमेत सहभागी सर्वांना पाणी व सरबत याची सोय संजीवन नॉलेज सिटीने केली होती. कार्यक्रमाची सांगता मयूर उद्यान येथे झाली. भाग घेतलेल्यांना जेवणासह प्रशस्तिपत्र देण्यात आले. (प्रतिनिधी)