ऐन उन्हाळ्यात पन्हाळकरांना पाणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:18 AM2021-04-29T04:18:46+5:302021-04-29T04:18:46+5:30

पन्हाळा - पन्हाळगडाच्या कासारी नदीवरून येणाऱ्या पाणी समस्येत वाढ होत असून नव्या योजनेचे कासारी नदीत चुकीच्या जागी पाणी खेचणारी ...

Panhalkars have no water in Ain summer | ऐन उन्हाळ्यात पन्हाळकरांना पाणी नाही

ऐन उन्हाळ्यात पन्हाळकरांना पाणी नाही

Next

पन्हाळा - पन्हाळगडाच्या कासारी नदीवरून येणाऱ्या पाणी समस्येत वाढ होत असून नव्या योजनेचे कासारी नदीत चुकीच्या जागी पाणी खेचणारी विहीर (इंटकवेल) बांधली गेल्याने ऐन उन्हाळ्यात पन्हाळकरांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

१९८० सालची नळ पाणी पुरवठा योजना जीर्ण झाली म्हणून पाच वर्षांपूर्वी सुमारे पाच कोटी रुपयांची नवी योजना मंजूर झाली. नगर परिषदेकडे जुन्या योजनेसह नवी योजना हस्तांतरीत झाली. नव्या योजनेचे काम रखडत चार वर्षाने पूर्ण झाले असले तरी नगर परिषदेने २४x७ पाणी देण्याचे आश्वासन फोल ठरत पुन्हा एक दिवसाआड केवळ २० मिनीटेच पाणी मिळू लागले म्हणजे नवी योजना पन्हाळकरांसाठी कुचकामी ठरल्याने पन्हाळगडाचा पाणी पुरवठा सुरळीत कधी होणार, याची सर्व पन्हाळावासीयांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.

पन्हाळगडाला नव्या योजनेद्वारे पाणी पुरवठा करणारी सर्व तांत्रिक व जागेची ठिकाणे दाखवण्याची जबाबदारी जीवन प्राधिकरणच्या अभियंत्यांच्या सुचनेप्रमाणे केल्याचे नगराध्यक्ष रूपाली धडेल यांनी सांगितले असले तरी ते सुसंगत वाटत नाही. नगर परिषदच्या किरकोळ कामासाठी मोठ-मोठ्या बाहेरील अभियंत्यांकडून वारेमाप फी देत सल्ला घेतात, मग गावची पाणी पुरवठा करणारी ही योजना दीर्घ काळ चालणारी आहे. त्याला योग्य तंत्रज्ञान का घेतले नाही, असा सवाल उपस्थित होतो. जुन्या योजनेच्या पाइपलाइन, पाणी खेचणाऱ्या मोटारी वापरात आहेत, मग आसुर्लेमधून उत्रेमध्ये नव्या योजनेच्या इंटक व जाकवेल बांधली म्हणजे नवी योजना झाली का, आणि त्याला इतका खर्च होतो का, गावकऱ्यांना बरेच प्रश्न भेडसावत आहेत. कदाचित त्याचे उत्तर येणाऱ्या निवडणुकीत दिले जाईल; पण पाणी प्रश्न सुटणार नाही. तो प्रत्येक उन्हाळ्यात भेडसावणार, हे निश्चित आहे.

मार्च महिन्यापासून सलग तीन वेळेस कासारी नदीवर पाणी नसल्याने पन्हाळा नगर परिषद पाणी पुरवठा सलग दोन-दोन दिवस करू शकली नाही. याबाबत कासारी धरणाचे अभियंता संभाजी काटे यांच्याकडे संपर्क साधला असता, ते म्हणतात.. धरणात पाणी साठा पुरेसा आहे. तथापि, धरणातून वीज निर्मिती करूनच पाणी सोडावे लागते. हे पाणी यवलुज बंधाऱ्यावर येण्यास तीन दिवसांचा कालावधी लागतो; पण चालू वर्षी पाणी उपसा मोठ्या प्रमाणात होत असल्याने पाणी सोडले की संपते, अशी परिस्थिती आहे. यवलुज बंधाऱ्याच्या हद्दीत पन्हाळा नगर परिषद पाणी योजना येते आणि हा बंधारा धरणावरील शेवटचा बंधारा आहे. येथे पाणी येण्यास बाकीच्या गावच्या प्रचंड उपशामुळे वेळ लागतोय, तरी आम्ही लक्ष ठेवून असतो व जास्तीत जास्त पाणी सोडण्याचा प्रयत्न करतो.

फोटो------- पन्हाळा शहराला पाणी पुरवठा होणारी आजची कासारी नदीची स्थिती अशी आहे.

Web Title: Panhalkars have no water in Ain summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.