इचलकरंजीत यंत्रमाग कारखान्यात घुसून दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:50 AM2020-12-05T04:50:26+5:302020-12-05T04:50:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : जुना चंदूर रोड परिसरातील एका यंत्रमाग कारखान्यात अनोळखी दहा ते बाराजणांच्या टोळक्याने घुसून मालक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : जुना चंदूर रोड परिसरातील एका यंत्रमाग कारखान्यात अनोळखी दहा ते बाराजणांच्या टोळक्याने घुसून मालक व अन्य कामगारांना मारहाण केली. तसेच कारखान्यातील साहित्याची नासधूस करून तीस लाख रुपयांचे नुकसान केले. याबाबतची तक्रार महावीर मनोहर भोजे (वय ४३, रा. काडापुरे तळ) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, काडापुरे तळ येथे राहणारे महावीर यांनी जुना चंदूर रोड परिसरात गेल्या दीड महिन्यांपूर्वी यंत्रमाग कारखाना सुरू केला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास दहा ते बारा अनोळखी व्यक्तींनी कारखान्यात येऊन धुडगूस घातला. विशाल चौगुले यांच्यासह इतर कामगारांना मारहाण करून काम केल्यास पुन्हा येऊन मारहाण करण्याची धमकी देत एअरजेट लूमच्या पॅनेलची नासधूस करत दोन चालू बिमे कापून टाकली. भिंतीच्या काचा फोडत दहशत माजवली.
शिवाजीनगर पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून संशयितांचा तपास घेत आहेत. हल्ल्याचे कारण स्पष्ट होऊ शकले नसले तरी हा हल्ला वहिफणी व मेंडिंगच्या खात्यासंदर्भात झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे विकास जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास पी. डी. मगर करीत आहेत.