कोल्हापुरात पानसरे दाम्पत्यावर गोळीबार

By admin | Published: February 17, 2015 01:23 AM2015-02-17T01:23:00+5:302015-02-17T01:23:12+5:30

महाराष्ट्र सुन्न : दोघेही गंभीर जखमी; हल्लेखोर पसार

Pankarefar firing in Kolhapur | कोल्हापुरात पानसरे दाम्पत्यावर गोळीबार

कोल्हापुरात पानसरे दाम्पत्यावर गोळीबार

Next

 

 

 

 

 

 

 

 

कोल्हापूर : पुरोगामी चळवळीतील अग्रणी नेते, श्रमिक कष्टकरी व कामगारांचे पुढारी तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. गोविंद पंढरीनाथ पानसरे (वय ८१) यांच्यावर सोमवारी सकाळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खुनी हल्ला केला. या हल्ल्यात पानसरे यांच्या पत्नीही जखमी झाल्या असून, दोघांचीही प्रकृती गंभीर आहे. ही घटना पानसरे यांच्या निवासस्थानापासून सत्तर फुटांवर घडली. नरेंद्र दाभोलकर यांच्यावरील हत्येशी साधर्म्य दर्शविणाऱ्या या हल्ल्यामुळे महाराष्ट्र सुन्न झाला आहे.
पानसरे यांच्यावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध करत या घटनेमागे कोणत्या प्रतिगामीशक्ती आहेत, याचा तपास करण्यासाठी पोलिसांची दहा पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
माध्यमांना दिली.
गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा (वय ६७) सकाळी नित्यनियमाप्रमाणे फिरायला बाहेर पडले. सकाळी ९.२० वाजण्याच्या सुमारास ते घराकडे परतत असतानाच दोघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर पिस्तूलमधून पाच गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी पानसरे यांच्या मानेला, दुसरी काखेत, तर तिसरी त्यांच्या उजव्या पायाला लागली. यावेळी झालेल्या झटापटीत त्यांच्या पत्नी उमा यांच्याही डोक्याला गोळी घासून गेल्याने गंभीर दुखापत झाली. हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पानसरे पती-पत्नी रस्त्यावरच कोसळले. तोपर्यंत घरातून पानसरे यांच्या स्नुषा मेघा, नातू मल्हार व कबीर, तसेच त्यांचे नातेवाईक मुकुंद कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या पानसरे दाम्पत्यांना नजीकच्या अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पानसरे यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे त्यांना तत्काळ रक्त चढविण्यात आले. त्यांच्या हृदयाचे स्पंदन, नाडीचे ठोके नॉर्मल करण्यात यश मिळविले. त्यानंतर पानसरे पती-पत्नींवर एकाचवेळी शस्त्रक्रिया करण्यात आली. (प्रतिनिधी)


घटनाक्रम
सकाळी साडेसात
वाजता पानसरे दाम्पत्य फिरण्यासाठी बाहेर
नऊ वाजून २० मिनिटांनी सागरमाळकडून
घराकडे येत होते
सकाळी नऊ वाजून २७ मिनिटांनी अज्ञातांचा गोळीबार
दहा वाजण्याच्या सुमारास खासगी रुग्णालयात पानसरे, त्यांच्या पत्नी उमा यांना दाखल
सकाळी सव्वादहा वाजता शस्त्रक्रियेस सुरुवात
साडेदहाच्या सुमारास पोलीस घटनास्थळी दाखल
पावणेअकरा वाजल्यापासून ओसवाल यांच्या कुटुंबीयांकडून माहिती घेण्यास
पोलिसांची सुरुवात
अकरा वाजता विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक
डॉ. मनोजकुमार शर्मा यांची घटनास्थळाची पाहणी
ओसवाल यांच्या कुटुंबातील व्यक्तींचा पोलिसांना जबाब
दुपारी साडेबारा वाजता पुन्हा डॉ. मनोजकुमार शर्मा यांची पाहणी
दुपारी साडेतीन वाजता पहिली शस्त्रक्रिया पूर्ण
चार वाजता संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालय परिसरात घोषणाबाजी
पाच वाजता गृहराज्यमंत्री राम शिंदे यांची पोलीस ताफ्यातील गाडी अडविली, चप्पल फेकले

चळवळीतील नेत्यांवरील हल्ल्यांचा इतिहास
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर पुण्यात गोळ्या घालून खून करण्यात आला.
२० आॅगस्ट २०१३

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर पुण्यात गोळ्या घालून खून करण्यात आला.

१३ जानेवारी २०१०
माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्यावर वार करून त्यांचा खून करण्यात आला.

१६ जानेवारी १९९७१६ जानेवारी १९९७
कामगार चळवळीतील नेते कॉम्रेड दत्ता सामंत यांच्यावर बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून त्यांची जीवनयात्रा संपविली.
५ जून १९७०
कम्युनिस्ट पक्षाचे आमदार आणि कामगार चळवळीतील नेते कृष्णा देसाई यांची
मुंबईत हत्या.


आज ‘कोल्हापूर बंद’ नाही; केवळ मोर्चा
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध व हल्लेखोरांना तत्काळ ताब्यात घ्या, या मागणीकरिता ‘आम्ही भारतीय लोक आंदोलन’ व कोल्हापुरातील सर्व डाव्या पक्षांतर्फे आज, मंगळवारी कोल्हापूर बंदची हाक देण्यात आलेली नाही. केवळ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे, असे कम्युनिस्ट पक्षातर्फे गिरीष फोंडे यांनी सोमवारी रात्री स्पष्ट केले. कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


अण्णा म्हणाले, घात झाला
परिसरातील नागरिक शशिकांत जोग यांनी सांगितले की, ‘मला फटाके वाजल्यासारखा आवाज आला. मी बाहेर आलो तर एक महिला पालथी आणि एक माणूस खाली बसला होता. मी जवळ गेलो आणि पाहतो तर पानसरे अण्णा होते. त्यांच्या नाका-तोंडातून रक्त येत होते. ते एवढेच म्हणाले, ‘घात झाला, घात झाला’.

पानसरेंचा उपचारास प्रतिसाद
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या जीवास अतिरक्तस्रावाने धोका निर्माण झाला होता. शस्त्रक्रिया करून हा रक्तस्राव थांबविण्यात यश आले आहे. मानेतील व छातीची मोठी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे.
उपचारास ते चांगला प्रतिसाद देत असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अ‍ॅस्टर आधार रुग्णालयाचे डॉक्टर उल्हास दामले यांनी रात्री सात वाजता दिली.
पानसरे यांच्या मानेला लागलेल्या गोळीमुळे झालेला अतिरक्तस्राव थांबविणे व छातीतील बरगडीमध्ये घुसलेली गोळी आम्ही बाहेर काढली आहे. सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या नाडीचे ठोके व रक्तदाबही नियमित आहे.
पानसरे यांना तीन गोळ््या लागल्या आहेत. मानेला व पायाला दोन गोळ््या लागून गेल्या होत्या, तर एक गोळी त्यांच्या छातीच्या फासळ््याला लागली होती. ती आम्ही शस्त्रक्रिया करून बाहेर काढली. त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्या डोक्यालाही गोळी चाटून गेल्याने त्यांच्यावरही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
गोविंद पानसरे यांच्यावर तीन यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना सायंकाळी अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. रात्री साडेआठच्या सुमारास ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील यांनी रुग्णालयात पानसरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Web Title: Pankarefar firing in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.