पानसरे हत्येचे महत्त्वाचे धागेदोरे हाती

By admin | Published: June 7, 2015 01:17 AM2015-06-07T01:17:31+5:302015-06-07T01:17:31+5:30

रेखाचित्रे प्रसिद्ध : लवकरच मारेकऱ्यांपर्यंत पोहोचू; ‘एसआयटी’ प्रमुख संजयकुमार यांचा विश्वास

Pansare handed the key to the murder | पानसरे हत्येचे महत्त्वाचे धागेदोरे हाती

पानसरे हत्येचे महत्त्वाचे धागेदोरे हाती

Next

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी महत्त्वाच्या दोन-तीन शक्यतांवर पोलीस काम करीत असून, आम्ही लवकरच मारेकऱ्यांपर्यंत पोहोचू, असा विश्वास अतिरिक्त पोलीस महासंचालक (सीआयडी) व विशेष तपास पथकाचे प्रमुख संजयकुमार यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
त्यांनी यावेळी दोन मारेकऱ्यांची प्रत्येकी चार रेखाचित्रे व घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध करून दिले. त्यांच्यावरील हल्ला कौटुंबिक वाद, टोल आंदोलन की सनातनी प्रवृत्तींकडून झाला असावा, या सर्व शक्यतांवर पोलीस आजही काम करीत असून, त्यांतील कोणतीच शक्यता नाकारलेली नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
संजयकुमार दोन दिवस कोल्हापुरात आहेत. शुक्रवारी (दि. ५) त्यांनी तपास यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत दिवसभर बैठका घेतल्या. सायंकाळी पानसरे यांच्या स्नुषा श्रीमती मेघा पानसरे यांच्याशी पाऊण तास चर्चा केली व या सर्व तपासाची माहिती शनिवारी पत्रकारांना दिली. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा, पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा व नवी मुंबई गुन्हे शाखेचे उपायुक्त सुरेश मेंगडे उपस्थित होते.
संजयकुमार म्हणाले, ‘पानसरे हल्ल्याला तीन महिने व विशेष तपास पथक नियुक्त होऊन महिना झाला; परंतु तरीही आम्ही अजूनही कोणत्याही ठाम निष्कर्षापर्यंत आलेलो नाही; परंतु महत्त्वाचे दोन-तीन दुवे हाती आले असून, त्यांवर आम्ही काम करीत आहोत. त्यात यशस्वी झाल्यास गुन्हा उघडकीस येण्याची शक्यता आहे; परंतु हे काम एक-दोन दिवसांत होण्यासारखे नाही. या तपासासाठी सुरुवातीला वीस पथके नियुक्त केली होती.
त्यांची पुनर्रचना करून आता सात ते आठ पथके तयार केली आहेत. ती प्रत्येक मुद्द्यावर काम करीत आहेत. पानसरे यांच्यावर हल्ला होण्यापूर्वी हल्लेखोर त्याच परिसरात दोन तास फिरत होते, असे तपासात स्पष्ट होत आहे. पानसरे यांच्या घरासमोरील शाळेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये सकाळी ७ वा. ५७ मिनिटापासून ते हल्ला झाला त्यावेळी म्हणजे ९.२२ वाजेपर्यंत मोटारसायकलवरील हल्लेखोर दोन वेळा फुटेजमध्ये दिसत आहेत. त्याची आम्ही अधिक छाननी करीत आहोत.’
पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा म्हणाले, ‘हल्ला केल्यानंतर हल्लेखोर मोटारसायकलीवरून पानसरे यांच्या दारातूनच पुढे जाणाऱ्या रस्त्याने गेले. पुढे हा रस्ता सुभाषनगरकडे जातो, एवढ्या किमान निष्कर्षापर्यंत आम्ही आलो आहोत. त्यामुळे आतापर्यंत चार दिशांनी तपास करीत होतो. आता या एकाच दिशेने तपास करून पुढे याच मार्गावर आणखी काही कॅमेरे आहेत का, याचा शोध घेणे सोपे होईल. त्या दृष्टीने आम्ही काम सुरू केले आहे.
कोल्हापूरकरांची जबाबदारी...
कोल्हापूरसारख्या जागरूक शहरात सकाळी साडेनऊ वाजता पानसरे यांच्यावर हल्ला होऊनही मारेकरी सापडत नाहीत, अशी टीका पोलिसांवर केली जाते; परंतु तपासकामात माहिती देण्यासाठी पुढे येणे ही कोल्हापूरकरांचीही जबाबदारी आहे व त्यासाठी त्यांनी पुढे यावे, असे आवाहन संजयकुमार यांनी केले. ते म्हणाले, ‘सकाळच्या वेळी तिथे हुतात्मा स्मारकमध्ये हास्य क्लब सुरू असतो. विद्यापीठात फिरायला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांपैकी कुणीच संशयितांना पाहिले नाही, असे होत नाही. त्यामुळे त्यांनी स्वत:हून माहिती देण्यासाठी पुढे यावे. आम्ही त्याबाबत कमालीची गुप्तता पाळू. संपर्कासाठी फोन नंबर असे : मो. ९७६४००२२७४ किंवा ०२३१-२६५४१३३.
मारेकऱ्यांचे वर्णन
प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या सांगण्यावरून संशयित मारेकऱ्यांची रेखाचित्रे तयार केली. त्याच साक्षीदारांच्या सांगण्यावरून तज्ज्ञ रेखाचित्रकाराकडूनही संशयितांची रेखाचित्रे तयार केली आहेत. पोलिसांनी तयार केलेल्या रेखाचित्रामध्ये एकाचा रंग सावळा, चेहरा उभट, नाक टोकदार, तुरळक भुवया आहेत; तर दुसऱ्या मारेकऱ्याचा चेहरा गोल, रंग सावळा, नाक टोकदार, असून दोघांच्याही डोक्याला हिवाळी गुलाबी-तांबूस रंगाची मळकट टोपी व काळी दाढी आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने अंगामध्ये कुर्ता व शबनम बॅग अडकविलेली दिसते. दोघांचेही अंदाजे वय २६ ते २७ आहे. तयार करण्यात आलेले रेखाचित्र हे मारेकऱ्यांशी ८० टक्के मिळतेजुळते आहे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Pansare handed the key to the murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.