पानसरे स्मारक सुधारित आराखडा तयार
By admin | Published: January 13, 2017 12:34 AM2017-01-13T00:34:07+5:302017-01-13T00:34:07+5:30
वीस लाख रुपये खर्च अपेक्षित : मंगळवारी महानगरपालिकेमध्ये सादरीकरण होणार
कोल्हापूर : संपूर्ण आयुष्य सर्वसामान्य, कष्टकरी जनतेला न्याय्य हक्क मिळवून देण्यात खर्ची घालणारे ज्येष्ठ कामगार नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्या स्मारकाचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला असून, येत्या मंगळवारी महानगरपालिकेत त्याचे सादरीकरण केले जाणार आहे. आधीचा आराखडा पाच लाख रुपये खर्चाचा होता; परंतु महानगरपालिका लोकप्रतिनिधींच्या आग्रहाखातर तो आता २० लाखांचा करण्यात आला आहे.
आपल्या लोकोपयोगी क र्तृत्वाचा ठसा राज्य आणि देशाच्या पातळीवर उमटविणाऱ्या गोविंद पानसरे यांची हत्या होऊन पुढील महिन्यात दोन वर्षे पूर्ण होतील. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य चाहत्यांनी नवोदित कार्यकर्त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे या हेतूने पानसरे यांचे उचित आणि आगळे-वेगळे स्मारक तयार करण्याचा संकल्प केला आहे. पानसरे यांचा कोल्हापुरातील सर्वच घटकांशी जवळचा संबंध असल्याने महानगरपालिका लोकप्रतिनिधींनीही त्यात विशेष रस दाखविला. महानगरपालिकेच्या २०१६-१७ च्या अंदाजपत्रकात स्मारकाकरिता ५ लाखांच्या निधीची तरतूद केली.
पानसरे यांच्याबरोबरीने टोल आंदोलनात सक्रिय भागीदारी करणाऱ्या प्रसिद्ध आर्किटेक्ट राजेंद्र सावंत यांनी स्मारकाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी आराखडा तयारही केला. त्याचे सादरीकरण महानगरपालिकेत तत्कालीन महापौर अश्विनी रामाणे, स्थायी सभापती मुरलीधर जाधव यांच्या उपस्थितीत झाले. अश्विनी रामाणे यांनी स्मारकाचा आराखडा पाहिल्यानंतर काही सूचना केल्या. त्यावेळी पाच लाख रुपयांची तरतूद झाली असली तरी आणखी निधी लागणार असेल तर तो देण्याची तयारी रामाणे यांनी स्वीकारली; तसेच एकूण २० लाख रुपये देण्याचे त्यांनी जाहीर केले.
त्यामुळे स्मारकाचा आराखडा नव्याने करण्याचे काम सुरू झाले. दरम्यान, आर्किटेक्ट राजेंद्र सावंत आजारी पडल्यामुळे एक महिना हे काम थांबले. दरम्यानच्या काळात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन लाईन आऊट करून दिला. आता नवीन आराखडा तयार झाला आहे.
मंगळवारी तो महानगरपालिकेकडे दिला जाणार आहे. विशेष म्हणजे या स्मारकासाठी महानगरपालिका प्रशासनाने शेजारील आणखी काही जागा उपलब्ध करून दिली असून त्या जागी ग्रंथालय उभारले जाणार आहे. मिळालेल्या अतिरिक्त जागेवर गार्डनिंग केले जाणार आहे. (प्रतिनिधी)
स्मारकासाठी मनपा देणार
२० लाखांचा निधी.
मनपाने आणखी जादा जागाही उपलब्ध करून दिली.
स्मारकाशेजारी होणार ग्रंथालय व उद्यान.
पानसरे कुटुंबीयांच्या सूचनांचा स्मारकाच्या कल्पनेत समावेश.
तत्कालीन महापौर अश्विनी रामाणे यांच्या सूचनेप्रमाणे तसेच स्मारकाच्या संकल्पनेविषयी पानसरे कुटुंबीयांनी केलेल्या सूचनेप्रमाणे सुधारित आराखडा तयार झाला असून, महानगरपालिकेची मंजुरी मिळताच लगेचच कामाला सुरुवात करता येईल.
- राजेंद्र सावंत,
आर्किटेक्ट