पानसरे हत्याप्रकरणी न्यायालयाने अंदुरे, कुरणे यांचा जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 06:15 PM2020-08-24T18:15:38+5:302020-08-24T18:16:25+5:30
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे हत्याप्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपी सचिन अंदुरे व भरत कुरणे या दोघांनी ...
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे हत्याप्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपी सचिन अंदुरे व भरत कुरणे या दोघांनी दाखल केलेल्या जामीन अर्ज सुनावणीअंती न्यायालयाने सोमवारी (दि.२४) फेटाळला. या अर्जाची जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांच्यासमोर सुनावणी झाली.
कॉ. पानसरे हत्याप्रकरणी तपास यंत्रणेने आतापर्यत सचिन अंदुरे, भरत कुरणेसह २१ जणांविरोधी गुन्हे दाखल करून, १९ जणांना अटक केली आहे. आकोळकर व पवार हे दोघे अद्याप पसार आहे. त्याचा तपास यंत्रणेकडून कसून शोध घेतला जात आहे. याचदरम्यान अटक केलेल्या अंदुरे आणि कुरणे या दोघांनी जामिनावर सुटका करावी, याकरिता कसबा बावडा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला.
या अर्जावर सरकारी पक्षाकडून व या दोघा संशयितांच्या वकिलांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला. या युक्तिवादावेळी संशयित आरोपी अंदुरे व कुरणे यांचा अप्रत्यक्ष पानसरे हत्येमध्ये सहभाग आहे. त्यामुळे या दोघांचा जामीन अर्ज फेटाळून लावावा, अशी मागणी विशेष सरकारी वकील यांनी केला होती तर अंदुरे आणि कुरणे यांचा पानसरे हत्याप्रकरणी कुठेही संबंध दिसत नसल्यामुळे त्यांना जामीन मंजूर व्हावा, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली होती.
शुक्रवारी दोन्ही बाजूंचे वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर न्यायालयाने सोमवारी अंदुरे आणि कुरणे यांचा जामीन अर्ज फेटाळला.