पानसरे हत्या प्रकरण : कुरणे, सूर्यवंशीला न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 05:58 PM2018-12-15T17:58:05+5:302018-12-15T17:59:27+5:30
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणात हत्यार व दुचाकीची व्यवस्था केल्याच्या संशयावरून अटक केलेल्या दोघा संशयितांना शनिवारी न्यायाधीश एस. एस. राऊळ यांच्यासमोर हजर केले असता, त्यांना २९ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणात हत्यार व दुचाकीची व्यवस्था केल्याच्या संशयावरून अटक केलेल्या दोघा संशयितांना शनिवारी न्यायाधीश एस. एस. राऊळ यांच्यासमोर हजर केले असता, त्यांना २९ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
त्यानुसार संशयित वासुदेव भगवान सूर्यवंशी (वय २९, रा. करकी, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव), भारत ऊर्फ भरत जयवंत कुरणे (३७, रा. धर्मवीर संभाजी गल्ली, महाद्वार रोड, बेळगाव) यांना मुंबई व बंगलोर पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी एसआयटीचे दोन्ही पथके रवाना झाली.
पानसरे हत्याप्रकरणी संशयित वासुदेव सूर्यवंशी आणि भारत कुरणे यांना एसआयटीने १ डिसेंबरला अटक केली होती. या दोघांनी पानसरे हत्येसाठी दुचाकी आणि पिस्तूल पुरविल्याचे प्राथमिक तपासांत निष्पन्न झाले आहे. त्यानुसार न्यायालयाने दोन टप्प्यात चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
तपास अधिकारी तिरुपती काकडे यांनी या दोघांकडे कसून चौकशी केली. टेंबलाईवाडी येथे झालेल्या बैठकीच्या घटनास्थळाचा पंचनामा केला. सूर्यवंशी याने बेळगावहून दुचाकी कोल्हापुरात तावडे हॉटेल येथे वीरेंद्र तावडे याच्याकडे आणून दिली होती. त्या दुचाकीचा मालक कोण, ती कोठून आणली, तिचा कशासाठी वापर करण्यात आला.
पानसरे हत्येनंतर ती दुचाकी कोठे लपविली गेली. तसेच संशयित कुरणे याने पिस्तूल हस्तांतर केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न होत आहे. ते कोणाकडून कोठे ताब्यात घेतले. पिस्तूल कोणत्या वाहनातून नेले. कोणाला भेटला, जळगावमध्ये राहणाऱ्या कुरणेचे बेळगावमधील सूर्यवंशी याच्याशी संबंध कसे आले. पानसरे हत्येमध्ये वापरलेले हत्यार कोठे लपविले आहे. या हाती लागलेल्या माहितीचा तपास पोलिसांनी चौदा दिवसांत केला आहे.
हा संपूर्ण तपास अहवाल उच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे. सूर्यवंशी याचा एन. आय. ए. मुंबई न्यायालय आणि कुरणे याचा विशेष सत्र न्यायाधीश बंगलोर यांच्या परवानगीने ताबा घेतला होता. या दोघांना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने सूर्यवंशीला मुंबई, तर कुरणेला बंगलोर एसआयटीच्या ताब्यात देण्यासाठी दोन पथके रवाना झाली. यापूर्वी या दोघांची सीपीआर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.