पानसरे हत्येप्रकरणी पोलिसांना मार्गदर्शन
By admin | Published: June 6, 2015 12:26 AM2015-06-06T00:26:06+5:302015-06-06T00:28:10+5:30
संजयकुमार यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक
कोल्हापूर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी या तपासातील पोलीस अधिकाऱ्यांना राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व विशेष तपास यंत्रणेचे प्रमुख संजयकुमार यांनी शुक्रवारी मार्गदर्शन केले.
संजयकुमार यांनी कसबा बावडा येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्या उपस्थितीत रात्री उशिरापर्यंत बैठक घेतली. दरम्यान, संजयकुमार यांना भेटण्यासाठी पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे पोलीस अधीक्षक कार्यालयात गेल्या होत्या. पण, बैठकीमुळे त्या भेटू शकल्या नाहीत.
गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर १६ फेबु्रवारी रोजी सागरमाळ परिसरात गोळीबार झाला होता; तर २० फेबु्रवारीला गोविंद पानसरे यांचा मुंबईत खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी राज्य शासनाने अतिरिक्त पोलीस महासंचालक व विशेष तपास यंत्रणेचे प्रमुख संजयकुमार यांची नियुक्ती केली. पानसरे यांच्या हत्येला नुकतेच शंभर दिवस झाले आहेत. संजयकुमार यांनी या तपासामध्ये असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.