पानसरे हत्या; सूत्रधार तावडेच
By admin | Published: June 15, 2016 12:44 AM2016-06-15T00:44:12+5:302016-06-15T00:46:25+5:30
तावडेचा ताबा मिळण्यासाठी सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्याकडे मंगळवारी अर्ज सादर केला. त्यास न्यायालयाने मंजुरी दिली.
कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी ‘सीबीआय’ने अटक केलेला हिंदू जनजागरण समितीचा डॉ. वीरेंद्रसिंग तावडे हा ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील ‘मास्टर मार्इंड’ असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यासंबंधी महत्त्वाचे पुरावे हाती आले आहेत. डॉ. तावडेचा ताबा मिळण्यासाठी सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्याकडे मंगळवारी अर्ज सादर केला. त्यास न्यायालयाने मंजुरी दिली. सध्या डॉ. तावडे ‘सीबीआय’च्या पोलिस कोठडीत आहे. त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. ‘सीबीआय’चा तपास पूर्ण होताच त्याचा ताबा घेणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. सूत्रांनी दिली. पानसरे हत्येतील संशयित आरोपी ‘सनातन’ संस्थेचा साधक समीर गायकवाड याच्याकडे यापूर्वी ‘सीबीआय’च्या पथकाने कळंबा कारागृहात सखोल चौकशी केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि
डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास सीबीआय एसआयटी व सीआयडी (कर्नाटक) या तिन्ही तपास यंत्रणांद्वारे सुरू आहे. या तपासावर उच्च न्यायालय देखरेख करत आहे. ‘सीबीआय’च्या पथकाने ११ जूनला दाभोलकर हत्येप्रकरणी संशयित डॉ. वीरेंद्रसिंग तावडे याला अटक केल्याने देशभरात खळबळ उडाली. तावडे याचे आठ वर्षांपूर्वीचे कोल्हापूर कनेक्शन ‘सीबीआय’च्या तपासामध्ये पुढे आल्याने त्याच्याकडे ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येसंबंधी चौकशी केली असता अनेक गोपनीय पुरावे सीबीआयच्या हाती लागले आहेत. या तिन्ही हत्यांचा मुख्य सूत्रधार डॉ. तावडे असल्याचा प्राथमिक दावा ‘सीबीआय’ने केला आहे. तावडेच्या अटकेने पानसरे तपासाला गती मिळाली आहे.
डॉ. तावडे हा पानसरे हत्येचा मुख्य ‘मास्टर मार्इंड’ असल्याचे पुढे येताच कोल्हापूर पोलिस व ‘एसआयटी’ पथक खडबडून जागे झाले आहे. सोमवारी पोलिस मुख्यालयात काही निवडक वरिष्ठ अधिकाऱ्यांची गोपनीय बैठक झाली. तपासासंबंधी अपडेट माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी ‘सीबीआय’ व ‘एसआयटी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कोल्हापूर पोलिस फोनवरून संपर्कात असल्याचे समजते. पानसरे हत्येप्रकरणी सापडलेल्या गोळ्यांच्या सहा पुंगळ्या (त्यांमध्ये एक जिवंत व सहा रिकाम्या) स्कॉटलंड यार्ड पोलिसांकडे चौकशीसाठी पाठविल्या आहेत. त्यांचा अहवाल व तपासाचा प्रगती अहवाल दि. २३ जूनला मुंबई उच्च न्यायालयात सादर केला जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘सीबीआय’चे
पथक कोल्हापुरात
‘सीबाआय’चे चौघा अधिकाऱ्यांचे पथक सोमवारी कोल्हापुरात आले. या पथकाने आठ वर्षांपूर्वी तावडे राहत असलेल्या राजारामपुरी परिसरातील साईक्स एक्स्टेंशन व गंगावेश येथील दवाखान्याची माहिती घेतली.
त्याला ओळखत असलेल्या काही व्यक्तींकडे चौकशीही या पथकाने केली. त्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांच्याशी काहीवेळ चर्चा केली.
डॉ. बारी यांनी तपासासंबंधी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन ‘सीबीआय’च्या पथकास दिले.
त्यानंतर हे पथक मंगळवारी पुण्याला रवाना झाले.
'तावडेचे कोल्हापुरातील वास्तव्य
डॉ. तावडे सन २००२ ते २००८ या कालावधीत राजारामपुरी परिसरातील साईक्स एक्स्टेंशन येथे आई-वडील व पत्नीसोबत राहत होता. त्याने कान, नाक, घसा विकारतज्ज्ञ म्हणून गंगावेश येथील एका इमारतीत प्रॅक्सिसही केली. स्थानिक डॉक्टरांशी त्याने चांगले संबंध ठेवले होते. त्याचे संपूर्ण कुटुंब साधक म्हणून काम करत होते. सन २००८ नंतर त्याने साईक्स एक्स्टेंशन येथील बंगला विकून सातारा गाठला. या ठिकाणी दीड वर्षे डॉक्टरी व्यवसाय केला. त्यानंतर तो ‘सनातन’च्या पनवेलमधील आश्रमात वैद्यकीय सेवा देण्यासाठी गेला. हिंदू जनजागृती व सनातन संस्थेचा कोल्हापूर जिल्हा संघटक म्हणून काम पाहत होता. या कालावधीत कोल्हापुरातील अनेक कार्यक्रम, मेळावे, बैठका घेण्यामध्ये त्याचा पुढाकार होता. त्याच्या कोल्हापुरातील वास्तव्याची ‘सीबीआय’च्या पथकाने गोपनीय माहिती घेतली.