पानसरे हत्येमध्ये कोल्हापूरातील दोघांचा सहभाग, लवकरचं अटक : एसआयटीचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 02:15 PM2019-06-24T14:15:42+5:302019-06-24T14:18:02+5:30
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणात कोल्हापुरातील स्थानिक दोघांचा सहभाग असलेची कबुली नववा संशयित आरोपी शरद भाऊसाहेब कळसकर (वय २५, रा. केसापुरी, औरंगाबाद) याने पोलीस कोठडीमध्ये दिली आहे. त्या दोघांना लवकरच अटक केली जाईल, असे संकेत एसआयटीने दिले आहेत.
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणात कोल्हापुरातील स्थानिक दोघांचा सहभाग असलेची कबुली नववा संशयित आरोपी शरद भाऊसाहेब कळसकर (वय २५, रा. केसापुरी, औरंगाबाद) याने पोलीस कोठडीमध्ये दिली आहे. त्या दोघांना लवकरच अटक केली जाईल, असे संकेत एसआयटीने दिले आहेत.
कळसकरच्या १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांच्यासमोर हजर केले असता ८ जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी करुन त्याची रात्री उशीरा मुंबईच्या अर्थवरोड कारागृहात रवानगी केली.
मुंबईतील नालासोपारा परिसरातील एका घरातून पोलिसांनी गावठी बॉम्ब, डिटोनेटर, आठ पिस्तुले, आदी हत्यारे जप्त केली होती. या प्रकरणी मुंबईच्या दहशतवादी विरोधी पथकाने शरद कळसकरला अटक केली होती. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येच्या संशयावरून कळसरकरला अटक केली. त्यानंतर कर्नाटकातील पत्रकार गौरी लंकेश हत्येमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने बंगलोर एसआयटीने अटक केली. त्यानंतर पानसरे हत्या प्रकरणी त्याला दि. १० जून रोजी अटक केली.
पहिल्यांदा सात दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये बेळगावमध्ये झालेल्या बैठकींची ठिकाणे व काही साक्षीदारांची रुजवात त्याने घालून दिली. त्यानंतर पानसरे हत्येमध्ये कोल्हापुरातील स्थानिक आणखी दोघांचा समावेश असून त्यांचे वर्णन सांगितले. त्यामुळे एसआयटीने दूसऱ्यांदा न्यायालयात हजर करुन आणखी सात दिवसांची पोलीस कोठडी मागवून घेतली.
चौदा दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये कळसरकरच्या गावी केसापुरी, औरंगाबाद येथे घरी व शेतामध्ये छापा टाकून डायरी व मोबाईल त्याने लपविला होता. त्याचा शोध घेतला. कळकसर हा कोल्हापूरात उद्यमनगर परिसरात वास्तव्यास होता. तेथील काही लोकांकडे पथकाने चौकशी केली.
स्थानिक दोघांचा समावेश असणाऱ्यांची माहिती उपलब्ध केली आहे. लवकरच त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती एसआयटीने न्यायालयास केस डायरीमधून गोपनियरित्या दिल्याचे समजते. त्या दोघे सामाजिक संघटनेचे पदाधिकारी असल्याचेही बोलले जाते. एसआयटीने याबाबत गोपनियता ठेवली असून त्यांना अटक केलेनंतर नाव निष्पन्न होणार आहेत. सुनावणीला तपास अधिकारी अमृत देशमुख यांचेसह टिम उपस्थित होती.
दोन मिनिटात सुनावणी
चौदा दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर सोमवारी कळसकरला एसआयटीच्या पथकाने न्यायालयात हजर केले. न्यायाधिशांना न्यायालयीन कोठडी देण्यासंबधीचे विनंती पत्र दिले. त्यांनी लगेचच न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर कळसकरला पथक बाहेर घेवून गेले. अवघ्या दोन मिनिटामध्येच ही सुनावणी झाली.
संशयित आरोपीचे वकील समीर पटवर्धन न्यायालयात हजर होते. कळकरला आॅनलॉक प्रोव्हेजन अॅक्ट (युएपीए) नुकसार डॉ. दाभोलकर गुन्ह्यामध्ये ‘मोक्का’ लावला आहे. पानसरे हत्येमध्येही ‘मोक्का’ लावतात काय? अशी शंका अॅड. पटवर्धन यांना होती. ते तयारीनुसार आले होते. परंतु एसआयटीने या कलमाची मागणीच केली नाही. हे कलम लावले असते तर ३० दिवसांची पोलीस कोठडी कळकसरला मिळाली असती.