पानसरे हत्येसंबंधी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 06:07 PM2018-08-13T18:07:00+5:302018-08-13T18:09:48+5:30
नालासोपारा येथील स्फोटक प्रकरणात अटक केलेला शरद कळसकर याच्याकडून ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची दाट शक्यता आहे. कळसकरच्या कोल्हापूर वास्तवाची चौकशी सुरू असून एसआयटीची तीन पथके कर्नाटकसह पुणे आणि मुंबईला रवाना झाली आहेत. लवकरच महत्त्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
कोल्हापूर : नालासोपारा येथील स्फोटक प्रकरणात अटक केलेला शरद कळसकर याच्याकडून ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची दाट शक्यता आहे. कळसकरच्या कोल्हापूर वास्तवाची चौकशी सुरू असून एसआयटीची तीन पथके कर्नाटकसह पुणे आणि मुंबईला रवाना झाली आहेत. लवकरच महत्त्वाचे पुरावे हाती लागण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
पानसरे हत्येच्या तपासासंबंधी सोमवारी सकाळी पोलीस महानिरीक्षक कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली; परंतु बैठकीची माहिती प्रसारमाध्यमांना देता येत नाही. गोपनीय आहे, असे सांगून अधिकाऱ्यांनी आपली बाजू झटकली.
पानसरे हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटी पथकाने आपले सर्व लक्ष संशयित शरद कळसकर याच्यावर केंद्रित केले आहे. एसआयटीचे प्रमुख संजीव सिंघल यांनी तपास अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देऊन पथके रवाना केली आहेत.
मुंबई एटीएसचे एक पथक कोल्हापुरातही तळ ठोकून असून त्यांचा संपूर्ण तपास गोपनीय आहे. ते संशयित कळसकर याची कुंडली गोळा करीत आहेत. त्याची येथील स्थानिक संघटनेशी काही संबंध आहेत का? याची माहिती काढण्याचे काम कोल्हापूर पोलिसांनी सुरू केले आहे.
बंगलोर एसआयटी, कोल्हापूर, पुणे आणि मुंबईचे एटीएस पथक एकमेकांच्या संपर्कात असून तपासासंबंधी ते एकमेकाला माहितीची देवाण-घेवाण करीत आहेत. या तपासावर काहीही बोलता येत नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी सांगितले.
त्या शस्त्रसंचलनाची चौकशी
कोल्हापुरात काही महिन्यांपूर्वी एका हिंदुत्ववादी संघटनेने शस्त्र संचलन करीत मिरवणूक काढली होती. तलवारी, भाले, काठ्या, बंदुका, खंजीर अशी हत्यारे होती. ही मिरवणूक काढण्यामागचा उद्देश काय? हत्यार परवाने दिली कोणी? याची चौकशी करण्यासाठी एक विशेष पथक नियुक्त केले आहे; त्यामुळे या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडेही चौकशी होणार आहे.
संजीव सिंघल अनुभवी अधिकारी
तत्कालीन एसआयटीचे प्रमुख संजीवकुमार यांची बदली झाल्याने त्यांचा पदभार संजीव सिंघल यांच्याकडे देण्यात आला आहे. सिंघल हे अनुभवी अधिकारी असून सर्व कौशल्य वापरून तपास करीत आहेत; त्यामुळे लवकरच कॉ. पानसरे हत्या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचण्याची आशा निर्माण झाली आहे.