पानसरेंना युवा कलाकारांची अनोखी श्रद्धांजली
By admin | Published: October 26, 2015 08:57 PM2015-10-26T20:57:24+5:302015-10-27T00:20:43+5:30
‘तरंग’ लघुचित्रपटाची निर्मिती : आठ मिनिटांच्या लघुपटात अण्णांच्या कार्याची महती
संजय थोरात- नूल -दीन-दलित कष्टकरी आणि राबणाऱ्यांच्या पाठीशी सतत ढालीसारखे राहून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या झाली. कॉ. अण्णांना श्रद्धांजली म्हणून गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यांतील युवा कलाकारांनी लघुचित्रपट (शॉटफिल्म) तयार केला आहे. ‘तरंग’ असे चित्रपटाचे नाव आहे. अवघ्या आठ मिनिटांचा हा लघुचित्रपट कॉ. अण्णांच्या कार्याची महती स्पष्ट करून जातो.
कॉ. अण्णा नेहमीच फेरीवाले, गोरगरीब आणि कष्टकरी जनतेच्या पाठीशी असायचे. त्यांची झालेली हत्या या युवा कलाकारांच्या मनाला चटका लावून गेली. कॉ. अण्णांना कृतीतून श्रद्धांजली वाहण्याची कल्पना मोहित तानाजीराव घाटगे या युवा दिग्दर्शकाला सूचली अन् ‘तरंग’ हा लघुचित्रपट निर्माण झाला. आजऱ्याच्या रंगभूमी प्रॉडक्शनने त्याची निर्मिती केली. चार महिने या विषयावार अभ्यास व चर्चा झाली. गडहिंग्लजच्या बसस्थानकावर लघुचित्रपटाचे शुटिंंग केले गेले.
इयत्ता चौथीत शिकणाऱ्या चितळे (ता. आजरा) येथील आदिती अशोक तरडेकर व इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या गणेशवाडी (ता. आजरा) च्या करण गावडे या बाल कलाकारांची यात मुख्य भूमिका आहे. नूलचे प्रा. मोहन तराळ, गडहिंग्लजचे झाकीर मुल्ला यांच्याही भूमिका आहेत. कॉ. अण्णा अन् फेरीवाले यांच्यातील नातेसंबंध कसे आहेत, हे या लघुचित्रपटावरून समजेल. अवघ्या २१ ते ३० वयोगटांतील युवकांनी ‘तरंग’ साकारला आहे.
मोहित घाटगे (वय २१) याने ‘तरंग’ दिग्दिर्शित केला आहे. यापूर्वी त्याने लमाण जमातीची शिक्षणात होणारी परवड या संकल्पनेवर ‘लमाण’ हा लघुचित्रपट केला आहे. उजाड, कांदे-पोहे, तुझ्या-माझ्या प्रेमाचे, सिनेमावेडा या मोठ्या चित्रपटांच्या दिग्दर्शनात तो व्यस्त आहे.
एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर असणारा ऋतुराज जाधव (वय २६, रा. तिरवडे) हा डिप्लोमाधारक आहे. बारावीत शिकणारा देवेंद्र पिळणकर (आजरा), प्रोडक्शन मॅनेजर आहे. कन्नड चित्रपटातील युवा गायक ‘ओ-जीव’वे फेम अमित चौगुले (खणदाळ), अजिंक्य करतडकर यांचे संगीत व पार्श्वगायन आहे.
मयूर कांबळे, कांतीलाल कांबळे यांनी छायाचित्रणाची बाजू सांभाळली आहे. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे अवलोकन करणाऱ्या व नास्तिक असणाऱ्या मोहितच्या दिग्दर्शनाची ताकद इथे पाहावयास मिळते.
अभिनेता संग्राम साळवी, रुंजी फेम धनश्री काडगावकर, किशोरी शहाणे, कन्नड साहित्यिक कारेश बस्तवाडे, मल्हार पाटेकर यांनी ‘तरंग’ला उत्कृष्ट प्रतिक्रिया दिल्या आहेत. डाव्या चळवळीतील
ज्येष्ठ कार्यकर्ते आणि पानसरे कुटुंबीयांशी चर्चा करून हा लघुचित्रपट प्रदर्शित करण्याचा मानस दिग्दर्शक मोहित घाटगे यांने व्यक्त केला.