पानसरे यांची हत्या अर्थव्यवहारातून शक्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 07:22 PM2017-09-12T19:22:34+5:302017-09-12T19:22:34+5:30
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाखालील श्रमिक नागरी पतसंस्थेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नावे ४५ लाख ५१ हजार रुपयांची बेहिशेबी रक्कम ठेवलेली आहे. भाकपने या लाखो रुपयांचा तपशील निवडणूक आयोगालाही दिलेला नाही. त्यामुळे या पैशांतूनच कॉ. पानसरे यांची हत्या झाली असल्याचा पुनरूच्चार हिंदू जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्टÑचे समन्वयक मनोज खाड्ये, हिंदू विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला. या पतसंस्थेत ठेवी सन २०१५-१६ या वर्षात दिसून येत असून त्या आधीपासून या ठेवी ठेवल्या असल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली, त्यादृष्टीने पोलिसांनी तपास करावा, अशीही मागणी त्यांनी केली.
अॅड. इचलकरंजीकर म्हणाले, तथाकथित पुरोगामी आणि साम्यवादी मंडळींनी समाजहिताच्या नावाखाली जमवलेली बेहिशेबी मालमत्ता आणि आर्थिक घोटाळे याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. पानसरे यांच्या नेतृत्वाखालील श्रमिक नागरी पतसंस्थेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नावे ४५ लाख ५१ हजार ३५२ रुपयांची बेहिशेबी रक्कम ठेवलेली आहे. भाकपने या रकमेबाबत कोणताही तपशील निवडणूक आयोगाला दिलेला नाही. त्यामुळे या पैशांची सखोल चौकशी शासनाने अंमलबजावणी संचालनालय अन् सीबीआय यांच्याद्वारे करावी, अशीही मागणी करण्यात आली.
पानसरे हे भाकपच्या राज्य कार्यकारिणी सचिव, राष्टÑीय कार्यकारिणी सदस्य होते. श्रमिक नागरी पतसंस्थेत सन २०१५-१६ मध्ये आयटक आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी यांच्या नावे विविध खात्यांवर सुमारे ४५,५१,३५२ रुपयांच्या ठेवी आहेत. भाकप हा राष्टÑीय स्तरावरील पक्ष असून त्याने आयकर आणि निवडणूक आयोगाला या ठेवी लेखापरीक्षणात दाखविलेल्या नाहीत. या पैशांतूनच पानसरे यांची हत्या झाली असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या व्यवहाराची अंमलबजावणी संचनालय, सीबीआय, आयकर, केंद्रीय आर्थिक गुप्तचर विभाग, पोलीस यांनीही तपास करावा, अशी मागणी केली आहे. या पत्रकार परिषदेस बंडा साळोखे, महेश उरसाल, पतित पावन संघटनेचे सुनील पाटील हेही उपस्थित होते.
देशस्तरावरील पक्षाचे एकाच ठिकाणी आर्थिक अहवाल सादर होतात. त्यामुळे जर या पतसंस्थेतील ठेवी पक्षाने आपल्या देशस्तरीय आर्थिक कागदपत्रांत दाखविले नसतील तर पक्षाच्यावतीने पानसरे किंवा अन्य कार्यकर्ते पक्षाचा हा काळा पैसा सांभाळत होते, पक्षाला माहीतच नसताना पानसरे किंवा अन्य कार्यकर्ते स्वत:चा काळा पैसा पक्षाच्या नावावर ठेवत होते, अन्य कोणाचा तरी काळा पैसा पक्षाच्यावतीने सांभाळला जात होता, असेही निकष निघू शकतात, असेही इचलकरंजीकर म्हणाले.
गौरी लंकेश यांच्याही आर्थिक व्यवहाराची चौकशी करावी
गौरी लंकेश यांच्या प्रकरणातही भविष्यात आरोपाचे संकट ओढावू नये यासाठी कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकार आणि कर्नाटक पोलीस यांनी आताच गौरी लंकेश यांच्याही व्यवहाराची चौकशी करावी. त्याचे मोबाईल संभाषण, बँक खात्यांचे, आर्थिक व्यवहाराचे सर्व तपशील तपासावेत, अशीही मागणी अॅड. इचलकरंजीकर यांनी यावेळी केली.