पानसरे यांच्या हत्येचा तपास ठप्प

By admin | Published: August 15, 2015 12:42 AM2015-08-15T00:42:01+5:302015-08-15T00:42:01+5:30

सहा महिन्यांचा कालावधी : कार्यकर्त्यांत अस्वस्थता; आंदोलनासाठी बैठक

Pansare's murder was investigated | पानसरे यांच्या हत्येचा तपास ठप्प

पानसरे यांच्या हत्येचा तपास ठप्प

Next

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हल्ल्यास येत्या गुरुवारी (दि. २० आॅगस्ट) सहा महिने पूर्ण होत असतानाच मारेकऱ्यांबाबत जराही मागमूस लागलेला नसल्याने कार्यकर्त्यांसह समाजातही अस्वस्थता आहे. सध्यातरी पोलीस तपास ठप्पच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासन व पोलीस यंत्रणेवर दबाव वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कृती कार्यक्रम निश्चित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे ठरत आहे.पानसरे यांच्यावर सकाळी फिरायला गेल्यावर १६ फेब्रुवारीला हल्ला झाला व त्यानंतर त्यांचे २० फेब्रुवारीस निधन झाले. त्यानंतर सातत्याने पोलीस आम्ही आरोपींच्या मागावर आहोत असे सांगत आले आहेत. दोन महिन्यांपूर्वी ‘एसआयटी’चे प्रमुख संजयकुमार यांनी कोल्हापुरात येऊन पत्रकार परिषद घेऊन संशयितांची छायाचित्रे प्रसिद्ध केली. सीसीटीव्ही फुटेजही माध्यमांना उपलब्ध करून दिले. हे फुटेज पुण्यातील फिल्म अर्कार्व्हईजमधून अधिक स्वच्छ करून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले होते, परंतु त्याचे पुढे काय झाले हे समजलेले नाही. हा तपास आजच्या स्थितीत एकदमच ठप्प झाला असल्यासारखी स्थिती आहे. मध्यंतरी आमदार मुश्रीफ यांनी मारेकऱ्यांची नावे पोलिसांना माहीत आहेत; परंतु राज्य सरकारच्या दबावामुळे ती जाहीर होत नसल्याचा आरोप केला. त्यावरूनही गदारोळ झाला. पोलिसांनी मुश्रीफ यांच्याकडे अधिकारी पाठवून जबाब घेतला; परंतु त्यांना त्याबद्दल फारशी माहिती देता आली नाही. मुश्रीफ या आरोपाबद्दल विधानसभेतही बोलणार होते, परंतु ते देखील झालेले नाही. मुश्रीफ यांना दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली होती. त्यानुसार पोलिसांनी दोन संशयितांना पकडले होते. त्यांची चौकशी करण्यात आली; परंतु त्यातून हत्येबाबत खात्रीशीर सुगावा लागला नसल्याने त्यांना सोडून देण्यात आल्याचे समजते.
प्रत्येक महिन्याच्या २० तारखेला डाव्या चळवळीतील कार्यकर्ते ‘मॉर्निंग वॉक’ काढून हत्येचा निषेध करतात व पोलीस अधीक्षकांना भेटून तपासाबाबत आग्रह धरतात; परंतु आता तेवढ्याने हे प्रकरण तडीस लागणार नाही असे वाटू लागल्याने दबाव वाढविण्यासाठी आणखी काय करता येईल यासंबंधीची मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे.

पानसरे यांचे मारेकरी सापडत नाहीत हेच न पटणारे आहे. पोलीस आणि राजकारण्यांनी ठरविले तर या देशात एकही गुन्हा होणार नाही. आमदार हसन मुश्रीफ व जितेंद्र आव्हाड यांनी संशयितांच्या संदर्भात केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असून, राज्य सरकारला आरोपी माहीत असूनही त्यांना हात कुणी लावायचा, हा प्रश्न आहे; परंतु आता आम्ही फार काळ हाताची घडी घालून बसणार नाही.
- बी. जी. कोळसे-पाटील, माजी न्यायमूर्ती

माझ्या वडिलांचे निधन झाल्यामुळे मी सध्या रजेवर आहे. त्यामुळे तपासाबाबत काही सांगता येणार नाही. तुम्ही कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षक यांना त्याबाबत विचारावे.
- संजयकुमार
विशेष तपास पथकाचे प्रमुख

मी सध्या दोन दिवस बाहेरगावी आहे. कोल्हापुरात आल्यानंतर या तपासाबाबत माहिती देऊ.
- डॉ. मनोजकुमार शर्मा
पोलीस अधीक्षक कोल्हापूर

Web Title: Pansare's murder was investigated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.