‘पानसरें’चे दोषारोपपत्र त्रोटक शमशुद्दीन मुश्रीफ : वाव असूनही तपास करण्याचे टाळले
By admin | Published: January 15, 2016 11:57 PM2016-01-15T23:57:15+5:302016-01-16T00:48:23+5:30
‘पानसरें’चे दोषारोपपत्र त्रोटक शमशुद्दीन मुश्रीफ : वाव असूनही तपास करण्याचे टाळले
कोल्हापूर : ज्येष्ठ सामाजिक नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्त्येचा तपास अपूर्ण आहे. कडक शिक्षा होईल इतके पुरावे दोषारोपपत्रात नाहीत. त्यामुळे वाव असूनही तपास करण्याचे टाळले आहे. दोषारोपपत्रातील पानांची संख्या अधिक असली तरी त्रोटक आहे, असे मत माजी पोलीस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ यांनी शुक्रवारी मांडले.
‘पानसरेंचा खून, अर्धवट तपास आणि अपूर्ण दोषारोपपत्र’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. शाहू स्मारक भवनात व्याख्यान झाले. ‘माकप’चे राज्य सदस्य चंद्रकांत यादव अध्यक्षस्थानी होते. यावेळी मुश्रीफ यांनी लिहिलेल्या ‘देशातील नंबर वन ची दहशतवादी संघटना आरएसएस’ व ‘करकरेंना कोणी व का मारले’ या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.
मुश्रीफ म्हणाले, पानसरे हत्त्येचा दोषारोपपत्र गलेलठ्ठ आहे. त्यामध्ये खटल्यासाठीचे आवश्यक पुरावे कमी आहेत. प्रकरणात आरोेपी सनातनचा साधक समीर गायकवाडला अटक केली. मात्र, त्यांच्याकडून माहिती घेताना थर्ड डिग्रीचा वापर झाला नाही. समीरला फर्स्ट डिग्री वागणूक देऊन चौकशी केली. त्यामध्ये त्यांने पोलिसांना संभ्रमात टाकणारी, दिशाभूल करणारी उत्तरे दिली.
खटल्यात अतिशय महत्त्वाचा पुरावा असलेला प्रत्यक्षदर्शी चौदा वर्षांच्या मुलाचा जबाब आहे. जबाबात त्या मुलाने मारेकऱ्यासंबंधी अतिशय बारकाईने निरीक्षण सांगितले आहे. त्या मुलाच्या जबाबात गोळ्या घालताना एक आजोबा व अन्य एक व्यक्ती पाहिल्याचे स्पष्ट होते. गोळ्यांचा आवाज आल्यानंतर पळपळ असे म्हटलेले आजोबा कोण? त्यांनी मुलांच्या भल्यासाठी पळ म्हटले की, मारेकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी म्हटले याचा तपास झालेला नाही. समीरच्या साथीदारास पकडले नाही, हत्त्येसाठी वापरलेले हत्यार, मोटारसायकल जप्त केलेली नाही.
अॅड. पानसरे यांनी अंधश्रद्धा, विषमतेच्या आणि ‘सनातन’च्या विरोधात प्रखर मते जाहीर व्यासपीठावरून मांडली होती, असे दोषारोपपत्रात आहे; पण गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ या विषयावर पानसरे बोलत होते. मग १६ फेब्रुवारी २०१५ रोजीच का हत्या झाली, या दिशेने तपास करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. ‘हु किल्ड करकरे’ या विषयावर राज्यभर व्याख्यान देणार असे घोषित केले. त्यांच्या १६ रोजीच्या हत्त्येचे कारण हेच आहे, असे मुश्रीफ यांनी सांगीतले.
सतीशचंद्र कांबळे यांनी प्रास्ताविक केले. अनिल चव्हाण, स्मिता पानसरे, अॅड. बन्सी सातपुते, गिरीष फोंडे यांची भाषणे झाली. तेजस्विनी पांचाळ यांनी पाहुण्याची ओळख करून दिली. शेकापचे संभाजीराव जगदाळे उपस्थित होते.
सभागृह खचाखच..पुस्तक खरेदीस झुंबड
व्याख्यान ऐकण्यासाठी आलेल्या श्रोत्यांनी सभागृह खचाखच भरले होते. जागा नसल्याने व्यासपीठावर श्रोते बसले. बाहेर लावलेल्या स्टॉलवर मुश्रीफ यांची प्रकाशित झालेली पुस्तके खरेदीसाठी अक्षरश: झुंबड उडाली होती.