शिक्षणाचे नंदनवन, कचऱ्याची नाराजी
By Admin | Published: February 1, 2015 11:17 PM2015-02-01T23:17:12+5:302015-02-02T00:17:31+5:30
औषध फवारणीची वानवा : गटारींचे नियोजन फसले; प्रॉपर्टी कार्डांचा प्रश्न गंभीर
सुभाषनगर प्रभागात नगरसेवक सतीश घोरपडे यांचा दांडगा संपर्क आहे. प्रभागातील महापालिकेच्या शाळेचेही त्यांनी नंदनवन केले आहे. मात्र, प्रभागातील कचरा उठाव वेळच्या वेळी होत नाही; तर सरनाईक कॉलनी येथे गटारीचे नियोजन नसल्याने येथील नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सुभाषनगर म्हणजे ८० टक्के कष्टकरी व २० टक्के उच्चवर्गीय लोकांचा प्रभाग होय. सरनाईक वसाहत, जवाहरनगर, सुभाषनगर, वर्षानगर, संभाजी हौसिंग सोसायटी, संत रोहिदास कॉलनी या प्रमुख वसाहती या प्रभागात येतात. येथे नगरसेवक सतीश घोरपडे यांचा संपर्क आहे. त्यांनी येथील स्थानिक समस्या जाणून घेऊन एक-एक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. प्रभागात कष्टकरी लोक राहत असल्याने येथील पालकांचे मुलांच्या शाळेकडे दुर्लक्ष होत होते; त्यामुळे त्यांनी महापालिकेची शाळा सुधारणासाठी विशेष प्रयत्न सुरू केले. शाळेच्या इमारतीची डागडुजी व रंगरंगोटीसह शाळेभोवती कंपाउंड उभारण्यात आले आहे. शाळेतील मुलांना खेळण्यासाठी साहित्य बसविण्यात आले. तसेच शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याने दिवसेंदिवस शाळेतील मुलांची संख्या वाढत आहे.
प्रभागातील अंतर्गत रस्ते चांगले झाले आहेत. तसेच काही भागांतील गटारींचे कामसुद्धा युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे प्रभागातील अंतर्गत रस्ते व गटारीच्या समस्या नाहीशा झाल्या आहेत. मात्र, सम्राटनगर येथून सुभाषनगर चौकातील साईमंदिरापर्यंतचा रस्ता अजूनही खराब असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. या रस्त्यावर मोठी खडी टाकून त्यावर फक्त डांबरच टाकले आहे. हा रस्ता व्हावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
नगरसेवकांनी येथील पाण्याचा प्रश्न सोडविल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. मात्र, सरनाईक वसाहत येथे कचरा गाडी वेळच्यावेळी येत नाही. या वसाहतीसमोरील गल्लीत कचरा उठाव करण्यासाठी गाडी येते; मात्र ‘तुमच्या प्रभागासाठी ही कचरा उठावाची गाडी नाही,’ असे त्यावरील कर्मचारी सांगतात. त्यामुळे आमच्या प्रभागात वेळच्या वेळी गाडी यावी, अशी मागणी येथील नागरिकांमधून होत आहे. तसेच या ठिकाणी गटारींचे नियोजन नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच औषध फवारणीही केली जात नाही. त्यामुळे येथील नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
प्रभागातील काही भागांतील प्रॉपर्टी कार्डांचा प्रश्न गंभीर बनला आहे. तो सोडविण्यासाठी नागरिकांमधून कित्येक दिवसांपासून मागणी होत आहे. नगरसेवकांची भागात फेरी असते. त्याचप्रमाणे नगरसेवक दररोज सकाळी ११ वाजेपर्यंत घरी भेटून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
प्रभागात विविध सव्वादोन कोटींची विकासकामे केली आहेत. यामध्ये प्रामुख्याने अंतर्गत रस्ते केले आहेत. गटारींची कामे करण्यात आली आहेत. महापालिकेच्या सुभाषनगर हायस्कूलचे नाव बदलून आता ‘संत रोहिदास विद्यालय’ असे नामकरण करण्यात येणार आहे. गेल्या चार वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. राजीव गांधी आवास योजनेतून घर बांधण्यासाठी शासनपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
- सतीश घोरपडे, नगरसेवक
उद्याचा प्रभाग क्रमांक - ६७ राजलक्ष्मीनगर