मराठी शाळेसाठी पेरणोलीकरांची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:06 AM2018-02-19T00:06:57+5:302018-02-19T00:07:44+5:30
कृष्णा सावंत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आजरा : जिल्हा परिषदेच्या शाळा सध्या संक्रमणातून जात असताना पेरणोली ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने विविध स्तुत्य उपक्रम राबवून येथील मराठी शाळेसाठी पहिल्या टप्यात ७० हजाराचा लोकसहभागातून निधी जमा केला आहे. शाळाबाह्य व अंतर्गत गुणवत्तापूर्ण करण्यासाठी पेरणोलीकरांची धडपड सुरू आहे.
सुशोभीकरण करून शाळेची इमारत देखणी केली आहे. संरक्षक भिंतीवर झाडे लावा, झाडे जगवा, पाणी नाही-जीवन नाही, मुलगा-मुलगी भेद नको, मुलगी झाली खेद नको, गाव करा हागणदारीमुक्त आदी प्रबोधनात्मक वाक्ये व चित्रांद्वारे जनजागृती केली आहे.
माजी सरपंच तुकाराम सुतार यांच्या कालखंडात १४ व्या वित्त आयोगातून मंजूर झालेल्या शाळेतील शौचालय, बाथरूमचे काम सरपंच दीपिका सुतार, उपसरपंच प्राजक्ता देसाई व सर्व सदस्य यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाले आहे.
पेरणोलीतील ग्रामस्थ, समिती, मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांनी शाळेला संजीवनी देण्यासाठी सुरू केलेले प्रयत्न म्हणजे आशेचा किरण आहे. यानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या गुणवत्तापूर्ण शाळा टिकविण्यासाठी पेरणोली ग्रामस्थांतून प्रारंभ झाला आहे.
शाळेच्या माजी व्यवस्थापन समितीने कोणत्याही कार्यक्रमाचा प्रारंभ शिक्षणक्षेत्रात क्रांती केलेल्या फुले दाम्पत्य, शिवाजी महाराज, शाहू, आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने घालून दिलेल्या पायंड्याने होतो. मूल्य शिक्षणावर भर, मुलांचा वाढदिवस व खासगी कार्यक्रमासाठी शाळेचा वापर करण्यावर बंदी आदी निर्णय घेऊन शाळा गुणवत्तापूर्ण व संस्कारित करण्याचा निर्णय घेतला आहे.
समितीने शाळेच्या बाह्यांगाची सजावट, प्रबोधनात्मक घोषवाक्य व चित्रे रेखाटून शाळा बहुआयामी गुणवत्ताधारक करण्याचा प्रयत्न करून कळस चढवला आहे. मराठी शाळा मोडीत काढण्याचे शासनाचे धोरण पाहता पेरणोलीसारख्या सामाजिकदृष्ट्या व चळवळीच्या गावातून शाळा वाचविण्यासाठी तरुण कार्यकर्ते व ग्रामस्थांनी केलेला प्रारंभ म्हणजे अंधारानंतर येणारा प्रकाश असे समजले जाते. याकामी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष संजय दळवी, उपाध्यक्षा रोहिणी देसाई, सदस्य अरुण जाधव, काका देसाई, युवराज लोंढे, पवन कालेकर, मुख्याध्यापक प्रकाश देऊसकर, शिक्षक व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे.
सोशल मीडियातून निधी
सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात ७० हजार निधी जमा झाला, तर लोकसहभागातून २ लाख रुपये जमा करून शाळेला भविष्यात कोणतीही कमतरता भासणार नाही. याची काळजी घेण्यात येणार आहे.