परशुराम आर्थिक विकास महामंडळ झालेच पाहीजे, बहुद्देशीय ब्राम्हण संघाची कोल्हापुरात निदर्शने
By इंदुमती सूर्यवंशी | Published: October 27, 2023 06:03 PM2023-10-27T18:03:13+5:302023-10-27T18:04:00+5:30
कोल्हापूर : परशुराम आर्थिक विकास महामंडळ झालेच पाहीजे, जो ब्राम्हण हित की बात करेगा, वो कोल्हापूर पे राज करेगा, ...
कोल्हापूर : परशुराम आर्थिक विकास महामंडळ झालेच पाहीजे, जो ब्राम्हण हित की बात करेगा, वो कोल्हापूर पे राज करेगा, जय श्रीराम, मागणी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, श्री परशुराम जय जय परशुराम अशा घोषणा देत शुक्रवारी बहुद्देशीय ब्राम्हण संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने व एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
यानंतर शहराध्यक्ष केदार वाघापुरकर, सचिव अवधूत जोशी यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. यात गरिबी जात पाहून येत नसते हे जाणूनच शासनाने मराठा, ओबीसी, लिंगायत, गुरव अशा विविध समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळ जाहीर केले आहेत. संख्येने अत्यल्प असलेल्या ब्राम्हण समाजाला अन्य समाजाप्रमाणे आर्थिक समस्या भेडसावत आहे. गुणवता असूनही सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाल्याने गुणवंत, होतकरू तरुणांना व्यवसायाकडे वळावे लागत आहे. परंपरागत पौरोहित्यातून मिळणारे उत्पन्न अनिश्चित आहे. बँका कर्ज देत नाहीत. ब्राम्हण समाजाची मागणी विधानसभेत १० मार्चला लक्षवेधीमार्फत आमदार प्रकाश सोळंके यांनी मांडली. त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन मिळाले मात्र कार्यवाही झालेली नाही हे निदर्शनास आणून देण्यात आले.
यावेळी रघुनाथदादा शेतकरी संघटनेच्यावतीवने ॲड. माणिक शिंदे, अजय चौगुले यांनी संघाच्या मागणीला पाठिंबा दिला. यावेळी जयंत हरळीकर, प्रसाद कुलकर्णी, सचिन जनवाडकर, संजय जोशी, नंदकुमार मराठे, प्रसाद भिडे, बाबा वाघापूरकर, हर्षाक हरळीकर, गणेश देसाई, अजित ठाणेकर, संजय पोवार. राजेंद्र किंकर, उपस्थित होते.