हातकणंगलेत दाम्पत्याची आत्महत्या

By Admin | Published: January 24, 2016 12:59 AM2016-01-24T00:59:10+5:302016-01-24T00:59:10+5:30

संशयित युवक ताब्यात : चिठ्ठीत पत्नीवर अतिप्रसंग, त्रास दिल्याचा उल्लेख

Parent Suicide in Hathkangala | हातकणंगलेत दाम्पत्याची आत्महत्या

हातकणंगलेत दाम्पत्याची आत्महत्या

googlenewsNext

हातकणंगले : येथील खोत वसाहतीमधील युवकाच्या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून येथील शेतकरी कुटुंबातील यशवंत आण्णासो फुलारी (वय 3७) आणि त्याची पत्नी रागिणी यशवंत फुलारी (३२) या दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना लक्ष्मी इंडस्ट्रीज रस्त्यानजीक फुलारे मळ्यात शनिवारी पहाटे उघडकीस आली.
फुलारी दाम्पत्याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या अरुण पांडुरंग खोत या संशयित युवकास हातकणंगले पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याबाबतचा गुन्हा हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
घटनास्थळ व हातकणंगले पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, हातकणंगले येथील यशवंत फुलारी याची शेतजमीन लक्ष्मी ओद्योगिक वसाहतीजवळ आहे. याच ठिकाणी त्यांचा जनावरांचा गोठा वजा शेड आहे. दररोज शेताकडे जाऊन जनावरांची देखभाल करण्याचे काम यशवंत आणि त्यांची पत्नी करीत होते. इतरवेळी शेतातील काम करून हे कुटुंब गुण्यागोविंदाने राहत होते. शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर खोतवाडी वसाहतीमधील एका युवकाची नजर यशवंत यांची पत्नी रागिणीवर पडली होती.
शुक्रवारी रात्री यशवंत आणि त्यांची पत्नी रागिणी घरामध्ये जेवण झाल्यावर आपल्या भाच्याची मोटारसायकल घेऊन नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनासाठी जातो, असे सांगून घरातून बाहेर पडले. त्यांनी शेतातील जनावरांचा गोठा गाठला आणि गोठ्यातील तुळईस गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी म्हैशींचे दूध आणण्यास गेलेल्या यशवंतच्या भावाच्या लक्षात आली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी दोन
पाने चिठ्ठी लिहून ठेवली होती. ही चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
यशवंत याने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये त्याने सविस्तर मजकूर लिहिला आहे. त्यात म्हटले आहे की, गावातील खोत वसाहतीमधील अरुण पांडुरंग खोत हा युवक आपली पत्नी रागिणी हिला वारंवार मानसिक त्रास देतो. दोन ते तीनवेळा त्याने रागिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच आम्हाला ठार मारण्याची धमकी दिली जाते. या युवकापासून आमच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. म्हणून आम्ही आत्महत्या करीत आहोत.
दरम्यान, यशवंत व त्याची पत्नी रागिणी यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या अरुण पांडुरंग खोत या युवकास हातकणंगले पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यशवंत आणि त्याची पत्नी रागिणी यांच्या आत्महत्येमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेहाची उत्तरीय तपासणी हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले आहेत.
गावगुंडांना पोलिसांची भीती नाही
हातकणंगले या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पोलिसांचा वचक गुन्हेगारांवर नाही, हे यावरून सिद्ध होत आहे. गावगुंड आणि फाळकूटदादांना पोलिसांची भीती उरली नसल्याचे आजच्या घटनेवरून पुन्हा स्पष्ट होत आहे.
मुलांचा आक्रोश
यशवंत आणि त्याची पत्नी रागिणी यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. दोघांचे मृतदेह पाहताच मुलांनी टाहो फोडला होता. त्यांच्या आक्रोशाने उपस्थितांचे हृदय पिळवटून जात होते.
रिंगटोनची चर्चा
यशवंतच्या मोबाईलवर ‘जिना यहाँ मरणा यहाँ’ ही रिंगटोन होती. त्याने आपली जीवनयात्रा संपविली. या दरम्यान त्यांच्या मोबाईलवर आठ-दहा कॉल येऊन गेले होते. त्यावेळी वरील रिंग वाजतच होती. या रिंगटोनची चर्चा या ठिकाणी सुरू होती.

Web Title: Parent Suicide in Hathkangala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.