आई-वडिलांचे कष्ट हीच प्रेरणा
By admin | Published: September 26, 2016 01:10 AM2016-09-26T01:10:45+5:302016-09-26T01:10:45+5:30
विश्वास नांगरे-पाटील : रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर सिटीच्या ‘उडान २०१६’ला विद्यार्थ्यांची गर्दी
कोल्हापूर : समजून जीवनातील विविध प्रसंगांना आत्मविश्वासाने सामोरे जा. शिवाय स्वत: सकारात्मक रहा. भविष्यातील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी व्यक्तिमत्त्वाची बांधणी विद्यार्थी दशेमध्येच करा, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी रविवारी येथे केले.
युवकांच्या अंगी उद्योजकीय गुणवत्तेसह सांस्कृतिक कलागुणांचाही अंतर्भाव व्हावा या उद्देशाने रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर सिटीतर्फे आयोजित ‘उडान २०१६ द रायझिंग स्टार्स’ या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राजाराम महाविद्यालयातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरीचे डिस्ट्रिक्ट गर्व्हनर डॉ. विनयकुमार पै रायकर होते. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, जेवढा मोठा संघर्ष कराल, तेवढे मोठे यश मिळेल. त्यामुळे भविष्यातील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी व्यक्तिमत्त्वाची बांधणी विद्यार्थी दशेमध्येच करा. रोजच्या जीवनातील कॉमनसेन्स् आणि प्रेझेन्स् आॅफ मार्इंड हीच ताकद समजून कार्यरत रहा. १५ ते २५ हे वय खऱ्या अर्थाने स्वत:ला घडविण्याचे असते. या वयामध्ये मेंदूचा विकास होत असल्याने तसेच भविष्यातील वाटचालीची बीजे रोवली जातात. त्यामुळे योग्य वळण लावणे महत्त्वाचे असल्याने या वयात रेव्ह पार्ट्यांच्या नादाला लागायचे की, पुस्तकांच्या साथीने करिअर घडवायचे हे युवक-युवतींनी ठरवावे.
या कार्यक्रमास रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर सिटीचे अध्यक्ष शामसुंदर कोरगावकर, इव्हेंट चेअरमन राजेंद्र बेंद्रीकर-शिंदे, रोटरीचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्रीनिवास मालू, सचिव जयंत नेर्लेकर, खजानिस रवींद्र जाधव, अभिजित जाधव, राजू जोशी, श्याम नोतानी, एम. वाय. पाटील, विलास रेडेकर, राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत हेळवी, आदी उपस्थित होते. दरम्यान, कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात उद्योजक संग्राम पाटील यांनी ‘स्कील इंडिया’, तर सुभाष साजणे यांनी कौशल्य विकासाबाबत मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
संघर्ष, कठोर परिश्रमाची तयारी ठेवा
व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करण्यात पुस्तकेच महत्त्वाची ठरतात हे सांगताना नांगरे-पाटील यांनी स्वत:ची यशकथा सांगितली. ते म्हणाले, स्पर्धा परीक्षेद्वारे स्वत:चे करिअर घडविण्यासाठी मी मुंबईला एका ट्रंकेतून दोन-तीन शर्ट आणि पॅण्ट वगळता अधिकतर पुस्तकेच घेऊन गेलो. करिअरचे ध्येय साधताना पुस्तकांनी मला महत्त्वपूर्ण साथ दिली. रात्रंदिवस अभ्यास केला आणि आई-वडिलांचे स्वप्न सत्यात उतरविले. हे स्वप्न पूर्ण झाले म्हणून थांबलेलो नाही. आजदेखील माझ्या डोळ्यांत नावीन्यपूर्णता आणि मनात समाजाविषयी कारुण्य आहे. त्याच्या जोरावर प्रत्येक संघर्षाला सामोरे जात आहे. ज्यांना या मार्गावरून वाटचाल करून यश मिळवायचे आहे, त्यांनी प्रथम ध्येय निश्चिती करून त्यासाठी संघर्षासह कठोर परिश्रमाची तयारी ठेवावी.