पालकांनो सावधान : अल्पवयीन मुलाला गाडी दिल्यास गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 01:11 AM2018-03-14T01:11:10+5:302018-03-14T01:11:10+5:30
कोल्हापूर : अज्ञान मुलांची हौस पुरविण्यासाठी त्यांच्या हाती दिलेली मोटारसायकल त्यांची जीवघेणी ठरत आहे. बेफिकीर पालकही त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न करत नसल्याचे दिसून येते
कोल्हापूर : अज्ञान मुलांची हौस पुरविण्यासाठी त्यांच्या हाती दिलेली मोटारसायकल त्यांची जीवघेणी ठरत आहे. बेफिकीर पालकही त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न करत नसल्याचे दिसून येते. या मुलांच्या ‘धूम स्टाईल’च्या हौसेपुढे पादचारी नागरिकांच्या जिवालाही धोका पोहोचत आहे. या हौशी मुलांना आवर घालण्यासाठी पोलीस दलाने मंगळवारपासून कठोर पाऊल उचलले आहे. अठरा वर्षांखालील मुले गाडी चालविताना सापडल्यास त्यांच्यासह पालकांना हजार रुपये दंड भरावा लागणार तर आहेच, शिवाय अपघात झाल्यास गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात मुलांबरोबर पालकांनाही शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. पालकांनो सावधान, मुलांना गाडी देऊ नका, असे आवाहन पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी केले आहे.
वाहनांची रहदारी वाढल्यामुळे सर्व मार्गांवरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत आहे. अशा गंभीर परिस्थितीत महाविद्यालयीन तरुण बेशिस्तपणे वाहने चालविताना दिसतात. मोटारसायकलवर तिब्बल सीट बसून काही शाळकरी मुले, मुली भरधाव जाताना दिसत आहेत. उच्चभ्रू लोकांची मुले शाळा किंवा महाविद्यालयात येताना किमती आलिशान मोटारसायकल घेऊन येतात. त्यांची ‘स्टाईल’ मारण्याची पद्धत वेगळीच असते. शहर वाहतूक पोलिसांच्या समोरून महाविद्यालयीन तरुण सायरन काढून मोटारसायकली सुसाट वेगाने चालवत असतात. काहीवेळा ट्रिपल सीटवरून बिनदिक्कतपणे फिरत असतात. ‘ट्रॅफिक ड्राईव्ह’ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून अल्पवयीन मुले दुचाकीवर दिसल्यास कारवाई सत्र सुरू केले आहे.
तीन महिन्यांचा कारावास
मोटार वाहन कायदा कलम १८० नुसार अल्पवयीन मुलांचे पालक तसेच वाहनांचे मालक यांचेविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्णातील ३१ पोलीस ठाण्यांना दिले आहेत. या गुन्ह्णासाठी तीन महिन्यांचा कारावास किंवा हजार रुपये दंडाची तरतूद आहे. मंगळवारी दिवसभरात मुलांना दुचाकी दिल्याचा फटका पन्नास पालकांना बसला. जागेवर हजार रुपयांची पावती फाडावी लागली.
दंडाची प्रक्रिया
अठरा वर्षांखालील मुले
वाहन चालविताना
सापडल्यास : १ हजार
‘नो पार्किंग’मध्ये वाहन
पार्किंग करणे : २००
एकेरी मार्ग (वन वे)
तोडणे : २००
सिग्नल तोडणे : २००
फॅन्सी नंबरप्लेट
लावणे : १ हजार
वाहन चालविण्याचा परवाना नसणे : १ हजार
कर्कश हॉर्न लावून आवाज करणे : ५००
वाहन रजिस्टर नसणे : १ हजार
विमा नसणारे वाहन
चालविणे : २३००
अठरा वर्षांखालील मुलांना समज आलेली नसते. त्यामुळे ते विचार न करता मोटारसायकल चालवत असतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांच्या हातात वाहन देऊ नका, कायद्यात नवीन तरतूद झाली आहे. मुलासह पालकांवर गुन्हा दाखल केला जाईल.
- संजय मोहिते, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर